नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चाणक्य समजले जाणारे अहमद पटेल यांचे निधन झाल्याने आता त्यांची जागा कोण भरून काढणार, याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. यासाठी काही पर्यायी नावे समोर आली आहेत. प्रामुख्याने चार-पाच वरिष्ठ नेत्यांचा त्यात समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यातच पक्षाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा सुरू आहे. राहुल गांधी हे पुन्हा अध्यक्ष बनू शकतात आणि हे नेतृत्व आगामी काही काळासाठी त्यांच्याकडे राहू शकते, असे काही जणांना वाटते. तर सोनिया गांधी यांची भूमिका सल्लागाराची असणार आहे.
नव्या पिढीचा कल प्रामुख्याने राहूल गांधी यांच्याकडेच आहे. परंतु पक्षश्रेष्ठीची मर्जी सांभाळून सर्वांशी संवाद साधणारा नवा चाणक्य कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अहमद पटेल यांची जागा कोण भरून काढेल याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
मध्यवर्ती कार्यालय सांभाळणे आणि व्यवस्थापनाची भूमिका पार पाडणे याकरिता आता नवीन चेहरा आवश्यक आहे. कॉंग्रेसचा मुकाबला आता भाजपाचे वाजपेयी-आडवाणी यांच्याशी नसून मोदी-शाह या दिग्गज जोडीशी आहे. नवनवीन घटनांमुळे देशात नवनवीन आव्हाने निर्माण होत आहेत, अशा परिस्थितीत पक्षाप्रती निष्ठा, कामाचा अनुभव आणि प्रचंड कार्यक्षमता अशा सर्व निकषावर योग्य नेत्याचा शोध सुरू आहे. त्यात ज्येष्ठ नेते के. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसेच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह ही काही नावे असू शकतात. त्याचप्रमाणे मुकुल वासनिक आणि मल्लिकार्जुन खरगे देखील या यादीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमद पटेल यांची जागा यापैकी कुणाला मिळेल हे पुढील महिन्यात स्पष्ट होणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.