मालेगाव – कृषी विज्ञान संकुल हा नाविन्यपूर्ण प्रकल्प असून एकाच छताखाली पाच शासकीय कृषी महाविद्यालय हे मालेगाव पंचक्रोषीत मैलाच्या दगडासह संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.
शासकीय विश्रामगृहात आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील महाविद्यालय इमारतींच्या आराखड्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद, महात्मा फुले कृषी विज्ञापीठ राहुरीचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव मोहन वाघ यांच्यासह विविध विभागाचे तज्ज्ञ, कृषी विज्ञान संकुलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील काष्टी परिसरात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने कृषी विज्ञान संकुल हे शाश्वत विकासाचे प्रतीक म्हणून साकारण्यात येत असल्याचे सांगताना कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले, सुमारे 250 हेक्टर मध्ये साकारण्यात येणाऱ्या या पाचही महाविद्यालयाचा आराखडा तयार करताना तो पर्यावरणपूरक राहील. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासह अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रीत करून त्यावर विचारविनिमय करून सर्वसमावेशक असा आराखडा पुढील पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मालेगाव तालुक्यातील या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी जागेची व निधीची कमतरता नसून यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक शेतकऱ्यांसाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यात ग्रीन बिल्डींग संकल्पना, मेगा फूड पार्क, शेतकरी भवन, सोलर पॉवर जनरेशन, हेल्थ केअर सेंटर, जीम, मॉल, सेंट्रल लायब्ररी, सर्व सुविधायुक्त वसतीगृह आदि सर्व बाबींचा समावेश करण्यात यावा. या संकुलात शैक्षणिक पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजना या प्रकल्पासाठी उपयोगात घेण्यात याव्या असे निर्देशही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.
कृषी विज्ञान संकुलाच्या आराखड्यात उत्पादित युनिटचा समावेश करण्याचे सांगताना अधिष्ठाता डॉ.रसाळ म्हणाले, फळे, भाजीपाला नर्सरीप्रमाणेच बेकरी प्रोडक्शनची सुविधा याठिकाणी करण्यात यावी. मदर प्लांटचे प्लॉटचाही यात अंतर्भाव करण्यात यावा. सेंट्रल परचेसिंगसह सेंट्रल गोडावून उभारल्यास सुमारे 30 ते 40 टक्के खर्चात बचत होवू शकते. वर्षभर शेतीविषयक स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठीच्या सुविधेचाही यात अंतर्भाव करण्यासह विविध बाबींचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
विद्यापीठातील उपस्थित विविध विभागातील तज्ज्ञांनी सादर केलेल्या सर्व सूचना व मार्गदर्शन याचा गोषवारा संकलीत करून त्याचा या आराखड्यात अंतर्भाव करण्यात येईल व या प्रकल्पाचा सर्वसमावेशक आराखडा मंजूर करण्याचे आश्वासनही मंत्री श्री.भुसे यावेळी दिले.