मुंबई ः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही त्यांच्यावर सामनाच्या रोखठोक सदरातून टीका केली आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघातानं मिळाले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे शरद पवार यांनी देशमुख यांच्याकडे गृहमंत्रीपद दिलं, असं संजय राऊत यांनी रोखठोक सदरात म्हटलं आहे.
गृहमंत्रीपदाची एक प्रतिष्ठा व रूबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्रीपदावरील कोणत्याही व्यक्तीला काम करता येत नाही. पोलिस खातं आधीच बदनाम असून, अशा घटनांमुळे संशय अधिक वाढतो, असं राऊत यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिका-यांशी कारण नसताना वाद ओढवून घेतला. गृहमंत्र्यांनी कमीत कमी बोलावं. उठसूट कॅमे-यांसमोर जाणं, चौकशीचे जाहीर आदेश देणं योग्य नाही. पोलिस खात्याचं नेतृत्व फक्त सॅल्यूट घेण्यासाठी नसतं. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असतं. “सौ सुनार की एक लोहार की” असं वर्तन असलं पाहिजे. हा कणखरपणा प्रामाणिकपपणातून निर्माण होते हे विसरून कसे चालेल, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर सरकारचे आणि गृह खात्याचे वाभाडे निघालं. पण राज्य सरकारचा बचाव करायला एकही महत्त्वाचा मंत्री तत्काळ पुढे आला नाही. चोवीस तास गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. परमबीर यांचे आरोप सुरुवातीला खरे वाटले कारण सरकारकडे डॅमेज कंट्रोलची कोणतीही यंत्रणा नाही. एका वसुलीबाज फौजदाराचा बचाव सुरुवातीला विधिमंडळात केला. त्यानंतर परमबीर यांच्या आरोपांना कोणीही उत्तर द्यायला तयार नव्हतं. मीडियाचा ताबा काही काळासाठी विरोधी पक्षनेत्यांनी घेतला हे चित्र भयंकर होतं.
रश्मी शुक्ला व सुबोध जयस्वाल या बड्या अधिका-यांनी पोलिस खात्यातील काही बदल्यासंदर्भात व्यवहार होत असल्याची माहिती मिळताच यासंदर्भातील दलालांचे फोन टॅप केले. त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. हे फोन टॅपिंग आणि त्यातून मिळालेली माहिती गौडबंगाल आहे. मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून हे फोन टॅपिंग झाले. या संभाषणात ज्या अधिका-यांची नावे आली, त्यातील एकाही अधिका-यांची बदली झाली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप खोटा आहे. या खोट्या माहितीचा अहवाल घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले. केंद्रीय गृहसचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. हा प्रकार हास्यास्पद आहे, असा निशाणा राऊत यांनी फडणवीसांवर साधला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमकं काय केलं, राज्य सरकार आजही जावे यासाठी राज्यपाल राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. राज्यातील भाजपचे नेते उठसूठ राज्यपालांना भेटतात. सरकार बरखास्तीची मागणी करतात. त्यामुळे राजभवनाची प्रतिष्ठा काळवंडली आहे. अनिल देशमुख, वाझे, परमबीर सिंग यांचे पत्र या सर्व घोळात सरकारचा पाय नक्कीच अडकला. तो पुन्हा अडकू नये. अधिका-यांनी सरकारला अडचणीत आणले. अधिका-यांवर विसंबून राहण्याचा परिणाम राज्य सरकार भोगत आहे. आपल्याच मर्जीतले अधिकारी नेमण्याचा पायंडा नव्यानं पडला आहे. हे मर्जीतले अधिकारीच गोत्यास काळ ठरले. सरकारनं काय करावं हे सांगण्यासाठी हा प्रपंच नाही. सरकार निसरड्या टोकावरून घसरत आहे व नशिबानं वाचत आहे. या सर्व खेळात राज्याला नक्की काय मिळालं. निदान राज्याच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये. असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.