मुंबई – मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र’ शैक्षणिक वर्ष (२०२०-२०२१) पासून सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचा कोनशिला अनावरण समारंभ त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उपस्थितीत संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही मूल्याधिष्ठित सामाजिक पुनर्रचनेची जीवनदृष्टी केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय आणि मानव्यविद्या या अभ्यास क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरतील अशी ‘ध्येयधोरणे आणि विकासाची दिशा’ या संदर्भातील संशोधनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रांशी जोडून घेत विविध पदव्युत्तर व प्रमाणपत्र अभ्यासक्रम येथे राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये आंबेडकर स्टडीज, बुद्धीष्ट थॉट्स, डेव्हलपमेंट स्टडीज आणि सोशल पॉलिसी या विषयात पदव्यूत्तर पदवी करता येणार आहे. याचबरोबर आंबेडकरी विचार आणि तत्वज्ञान या विषयाचा देखील अभ्यास ऑनलाईन पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्कॉलर्सना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सोय आहे. तसेच ‘सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या’ आदी विषयांतही आंतरशाखीय संशोधनाची संधी उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम दर्जाचे संशोधन केंद्र म्हणून हे केंद्र उभे करण्याचा मुंबई विद्यापीठाचा मानस आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान तसेच सामाजिक न्यायविषयक दृष्टिकोन यांच्या अभ्यासाची जगभरात विविध संशोधन केंद्रे आहेत. त्याच धर्तीवर भारतामध्ये मुंबई विद्यापीठाने आपल्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे असे उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी मुंबई विद्यापीठाने हिरीरीने पुढाकार घेतला असून या संशोधन केंद्राची स्वतंत्र इमारत असावी यादृष्टीने विद्यापीठ नियोजन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून आज या केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.