मार्गशीर्ष महिन्याचे धार्मिक व पौराणिक महत्त्व
मार्गशीर्ष महिना हा मराठी महिन्यातील नववा महिना येतो. हा महिना १५ डिसेंबर २०२० ते १३ जानेवारी २०२१ या कालावधीत येत आहे. या महिन्यास अग्रहायण मास असे म्हटले जाते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णा ने वृक्षांमध्ये मी पिंपळ स्वरूप आहे, शस्त्रधारी योद्ध्यांमध्ये मी श्रीराम स्वरूप आहे तर महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष स्वरूप आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिना कृष्ण स्वरूप आहे, अशी मान्यता आहे.
याच महिन्यामध्ये २० डिसेंबरला चंपाषष्टी, २५ डिसेंबरला मोक्षदा अर्थात वैकुंठ एकादशी व भगवद्गीता जयंती, २९ डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात श्री दत्तजयंती आणि ३१ डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग आहे. मार्गशीर्ष महिन्यातच सत्य युगाची सुरुवात झाली अशी मान्यता आहे. याच महिन्याच्या सुरुवातीपासून देव लोकांची कालगणना सुरू होते असे मानतात. हा महिना अतिशय पवित्र मानला गेल्याने या महिन्यात श्रीमद्भगवद्गीता पठण, स्कंदपुराण पठण, गजेंद्र मोक्ष पठण भागवत पठण करावे. या महिन्यांमध्ये जप, तप, दान, नदी स्नान, आदी पुण्यकर्मे सांगितली आहेत. याच महिन्यामध्ये कश्यप ऋषींनी निसर्गसुंदर काश्मीरची भौगोलिक रचना केली अशी मान्यता आहे.
दक्षिणावर्ती शंख पूजन व शंखातील पाणी वास्तूमध्ये प्रक्षालन करणे, त्याचप्रमाणे ‘ओम दामोदराय नमः’, ‘ओम नमो नारायणाय नमः’, ‘गायत्री मंत्र’ अशा मंत्रांचे जप हे पुण्यकर्म सांगितले आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्र पूजन याचे विशेष महत्त्व आहे. वर्षभरातील मासिक उपासाची सांगता याच महिन्यात वैकुंठ एकादशी ला केली जाते. मार्गशीर्षातील चारही गुरुवार विशेष महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्या चारही गुरुवार उपवास करणे चार गुरुवार महालक्ष्मी व्रत करणे यास विशेष पुण्यप्राप्ती सांगितले आहे.
अनेक घरांमधून महिला वर्ग मोठ्या संख्येने मार्गशीर्ष गुरुवार, उपवास व्रत अखंडपणे करतात. या व्रतासाठी हार, फुले, अगरबत्ती, नारळ, कलश, हळद, कुंकू, एखादे फळ, महालक्ष्मी फोटो, गोडाचा नैवेद्य ही सामग्री लागते. षोडशोपचारे देवीची पूजा झाल्यानंतर लक्ष्मी कथा वाचन करावे. ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ हा जप एकशे एक वेळा करावा.
देवीची आरती करून नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास करावा. रात्री उपवास सोडताना अन्नपदार्थात जीरे घालू नये. विष्णुसहस्त्रनाम, देवी सहस्त्रनाम या जपाचेही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. याच महिन्यात सूर्याचा उत्तरायण प्रारंभ होतो. अशा पद्धतीने ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूपातील सर्व देवतांची कृपा दृष्टी मार्गशीर्ष महिना वर असल्याने या महिन्यात धार्मिक विधी केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता आहे. आपले जे काही मनोरथ पूर्ण होण्यास शीर्ष आहे. म्हणजेच बाकी आहे. ते सर्व या महिन्यात आपण करत असलेल्या धार्मिक विधी जप-तप यामुळे मार्गी लागेल, असा हा मार्गशीर्ष महिना आहे.