पंडित दिनेश पंत
दिवाळीनंतर सर्वांना वेध लागतात ते तुलसी विवाह समारंभाचे. कारण हिंदू शास्त्राप्रमाणे तुलसी विवाह नंतरच लग्नसराईतील लग्नाचे मुहूर्त काढले जातात. म्हणजे खऱ्या अर्थाने तुलसी विवाह नंतरच लग्नसराई सुरू होते. यावर्षी २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत तुलसी विवाह समारंभाचे मुहूर्त आहेत.
कार्तिक शुद्ध द्वादशी ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा या कालावधीत तुलसी विवाह केले जातात. समुद्रमंथनाच्या वेळी जे अमृत सापडले त्याचे काही थेंब पृथ्वीवर पडले त्यातून तुळशीचा जन्म झाला म्हणजे तुळस उगवली म्हणून तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही अमृत् स्वरूप आहे.
पुराण शास्त्र आणि विविध साधुसंतांनी देखील तुळशीचे महत्त्व विषद केले आहे. विज्ञाना प्रमाणदेखील तुळस ही कार्बन-डाय-ऑक्साइड शोषून घेते व अधिक प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्यामुळे आसपासचा परिसर उत्साही राहतो म्हणूनच तुळशीला अंगणामध्ये स्थान दिले आहे.
तुळशी वरून वाहून येणारा वारा देखील त्या वास्तूचा सर्व परिसर नैसर्गिकरित्या शुद्ध करतो. तुळशीचे दर्शन घेणे, तुळशीचे पान चावून खाणे, तुळशीजवळ सायंकाळी दिवा लावणे हे पुण्यकर्म समजले आहे. अंगणात तुळस असल्यास त्या घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहते.
पुजेचे साहित्य
तुळशीची कुंडी अथवा वृंदावन, बाळकृष्ण मूर्ती, मुंडावळ्या, वधू-वरांची वस्त्रे, हळद, कुंकू, फुले, दिवे, अंतरपाट, नवीन वस्त्र, गोड प्रसाद.
तुलसी विवाहाची पद्धत व मुहूर्त
२६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सायंकाळी साडे सहा ते साडे सात या गोरज मुहूर्तावर तुलसी विवाह करावा. यामध्ये तुलसी ही वधू तर विष्णू स्वरूप बाळकृष्ण हे वर स्वरूपात असतात. यामध्ये प्रथम तुळशी वृंदावन सजवावे. त्याभोवती दिवे फुलांच्या रांगोळ्या काढाव्या. छान संगीत लावावे. तुळशीला नवीन वस्त्र, साडी, नवरीचा साज शृंगार करावा. त्याचप्रमाणे बाळकृष्णला देखील नवीन वस्त्र व गंध लावावे. तुळशी वृंदावन यामागे ऊस उभा करावा. ऊस म्हणजे लग्नातील मामा होय.
तुळशी समोर पाटावर फुलांची रांगोळी दिव्यांची आरास करून श्रीकृष्णाला ठेवावे. त्यानंतर तुळस व श्रीकृष्ण याच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणावे. तुळशीची आरती करावी. खणा-नारळाने तुळशीची ओटी भरावी. सर्वांना गोडाधोडाचा प्रसाद द्यावा.