- जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचा गौरव…
- अभिजात वाड़मयावर चर्चासत्र
- मनोहर शहाणे यांचा करणार जाहीर सत्कार
- संमेलनाचे उद्घाटन राजकीय नेत्याच्या हस्ते नव्हे, तर लेखकाच्या हस्ते होणार…
नाशिक : शहरात २६ ते २८ मार्च रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व विज्ञान कथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली असून तीन दिवस होणाऱ्या या संमेलनात सहा परिसंवाद, दोन काव्य संमेलने, अभिजात वाड़मयावर चर्चासत्र आदि भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
विशेष म्हणजे या साहित्य संमेलनात ज्येष्ठ कथा लेखक मनोहर शहाणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार असून नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यानिमित्त होणाऱ्या विविध उपक्रमाची सुरुवात या संमेलनातूनच होणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात होणार असून यासंबंधी अधिक माहिती देताना ठाले-पाटील यांनी सांगितले की, या साहित्य संमेलनासाठी एकूण सहा नावे चर्चेत होती, यात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर, ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, विज्ञान कथा लेखक डॉ. बाळ फोंडके, संत वाड़मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ कथालेखक मनोहर शहाणे यांचा समावेश होता. परंतु बहुमताने निर्णय घेऊन डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले.
कोरोनाचे सावट काहीसे दूर झाले असले तरी संमेलनासाठी रोज तीन दिवस दोन सकाळ-सायंकाळ अशा दोन वेळेस सर्व तीन्ही सभामंडप सॅनेटाईज करण्यात येतील, सर्व मान्यवर आणि उपस्थित रसिक यांना मास्क लावण्याचे सांगण्यात येईल, तसेच विविध विधायक सूचनांचा विचार करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. तसेच संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहूणे म्हणून कोणत्याही राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्याऐवजी मान्यवर लेखकाला बोलविण्यात येईल, मात्र त्यांचे नाव अद्याप निश्चित झाले नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. राजकीय क्षेत्रातील लोकांना रसिक म्हणून उपस्थित राहण्यास विरोध नाही, असे त्यांनी सांगितले. नाशिक येथे संमेलन होणार असल्याने जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेला उजाळा देण्याचा प्रयत्न संमेलनातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष कपूर वासनिक, कोषाध्यक्ष दादा गोरे, विलास मानेकर प्रदीप दाते, गजानन वारे, प्रा. शंकर बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.