नवी दिल्ली – आपल्या आवडत्या हीरो़ – हिरॉईनच्या आयुष्याबाबत आपल्याला नेहमीच कुतूहल असते. त्यात जर व्हॅलेंटाइन डे सारखे काही महत्त्वाचे दिवस असतील, तर मग विचारायलाच नको. त्यांनी हा दिवस कुठे साजरा केला असेल, ते त्यांनी एकमेकांना काय गिफ्ट दिलं असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. अशाच काही जोड्यांनी आपापला व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला, हे आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत.
इरा खान – नुपूर शिखरे
अभिनेता आमीर खान याची ही मुलगी. तर नुपूर हा आमीर खानच्या पर्सनल ट्रेनरचा मुलगा. प्रॉमिस डे च्या दिवशी इरा खानने हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. इरा ही सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. प्रॉमिस डेच्या दिवशी तिने इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर केला होता. तर व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी, नुपूरने त्याचा आणि इराचा फोटो शेअर केला. इराने देखील इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक बुके दिसतो आहे, त्यावर ह्रदयाची खूण असलेले अनेक स्टिकर्स आहेत. हा बुके तिला नुपूरने दिला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करताना, हा बुके त्यांनी बनवला असल्याचे इरा सांगते.
मलायका अरोरा – अर्जुन कपूर
अरबाज खानपासून वेगळे झाल्यावर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी आपले नाते जाहीर केले होते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मलायकाने अर्जुन कपूरच्या टी शर्टचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर ‘लव्ह इज इन द एअर’, असा संदेश लिहिलेला आहे. या दोघांनीही व्हॅलेंटाईन डे उत्साहात सेलिब्रेट केला. यात तिने अर्जुन कपूरला टॅग केले आहे. जून २०१९ मध्ये अर्जुनच्या वाढदिवशी या दोघांनी आपले नाते जाहीर केले होते. ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’च्या स्क्रीनिंगच्या वेळी हे दोघे सोबत होते. लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी बराच काळ एकत्र घालवला असून लवकरच ते लग्नही करू शकतात.
अनुष्का शर्मा – विराट कोहली
नुकतेच आई – बाबा म्हणून प्रमोशन मिळालेल्या विरूष्का यांचा व्हॅलेंटाईन डे कसा असेल, याची साऱ्यांनाच उत्सुकता होती. पण सध्या विराट चेन्नई येथे असून इंग्लंड विरोधात कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे विराट अनुष्का या दिवशी सोबत नव्हते. अनुष्का शर्माने सूर्यास्ताचा एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, हा दिवस मी काही फार मानत नाही. पण, सूर्यास्ताचा हा फोटो शेअर करणं, माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सूर्यास्ताच्या वेळेस विराट आणि अनुष्का एकत्र असतानाचा हा फोटो आहे. हा माझा नेहमीचाच व्हॅलेंटाईन आहे. या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर २ हजारहून अधिक कॉमेंट्स आल्या आहेत. या दोघांना नुकतीच एक मुलगी झाली असून तिचे नाव वामिका ठेवले आहे.