चांदवड परिसरात सह्याद्रीचा परिसर हिरवाईने नटला आहे.आपल्या रुबाबदार अंगकाठीने गड किल्ले पर्यटकांना आकर्षून घेत आहेत. चांदवड तालुक्यातील हा कांचन किल्ला आपला इतिहास अंगाखांद्यावर घेऊन असाच डौलात उभा आहे. या किल्याविषयीची माहिती खास आपल्यासाठी.
किल्ल्याची उंची : ३७७२
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात पूर्व – पश्चिम पसरलेल्या अजिंठा – सातमाळ रांगेत अचला, अहिवंत, मार्कंड्या, रवळाजवळा, कन्हेरगड, धोडप, कांचन हे किल्ले आहेत. शिवकालात शिवाजीमहाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर झालेली ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली. बारी म्हणजे खिंड, या खिंडीमार्गे होणार्या व्यापारावर / वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी.
इतिहास
२ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर १६७० या तीन दिवसात सुरतेची दुसर्यांदा धुळधाण उडवून प्रचंड लूट घेऊन शिवाजी महाराजांनी बागलाणाकडे कुच केली. ही बातमी कळताच दाऊदखान हा मोगली सरदार फौजेनीशी बर्हाणपूराहून महाराजांच्या पाठलागावर निघाला. १६ ऑक्टोबर १६७० रोजी दाऊदखान चांदवडजवळ पोहोचला. स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळ डोंगररांग ओलांडणे आवश्यक होते व तेथेच दाऊदखान आडवा येण्याची शक्यता गृहीत धरुन महाराजांनी रात्रीच आपल्या १५००० फौजेची २ भागात विभागणी केली. पायदळाचे पाच हजार हशम, लुटीची घोडी व सामान मार्गी लावून स्वत: १०००० फौज घेऊन लुटीच्या पिछाडीस राहिले.
१७ ऑक्टोबरला सकाळीच युध्दाला कांचन – मंचन (कांचनबारीत) च्या परिसरात तोंड फुटले. सहा-तास चाललेल्या या तुंबळ युध्दात खुद्द महाराजांसह प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, भिकाजी दत्तो यांनी भाग घेतला. मोगलांवर चारही बाजूंनी हल्ला करुन ३००० मोगली सैनिक कापून काढले. मोगली सेनेचा दारुण पराभव झाला. या युध्दाचे वैशिष्टे म्हणजे गनिमी काव्याचा वापर न करता मोठ्या फौजेनिशी (१५०००) मैदानात महाराजांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर लढले गेलेले व जिंकलेले युध्द होते. या युध्दाचा परिणाम एवढा मोठा झाला की, दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्दी हिलाल महाराजांना येऊन मिळाला व महाराजांनी या भागातील जवळजवळ सर्व किल्ले पुढील काळात ताब्यात घेतले.
पाहण्याची ठिकाणे :
कांचन किल्ला तीन भागात विभागलेला आहे. यातील दोन मुख्य भाग कांचन – मंचन म्हणून ओळखले जातात. खेळदरी गावातून ३ तासात आपण कांचन गडाच्या पूर्वेकडील (दूरुन पिंडीसारख्या दिसणार्या) कातळ टप्प्यापाशी येऊन पोहोचतो. मुख्य वाट सोडून उजवीकडे गेल्यावर गुहा पाहायला मिळते. ती पाहून परत मुख्य वाटेवर येऊन कातळात खोदलेल्या पायर्यांवरुन आपण या कातळटप्प्याच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर रांगेत खोदलेली पाण्याची ५ टाकं आहेत. ती पाहून खाली उतरुन मधल्या कातळभिंतीला वळसा घालून पश्चिमेचा कातळटप्पा गाठावा. येथे उध्वस्त प्रवेशद्वार व थोडी तटबंदी शाबूत आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर पाण्याच टाक व गुहा पाहायला मिळतात. त्यांच्यापुढे दोन थडगी, उध्वस्त वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या पश्चिम टोकाला अजून दोन कातळटप्पे आहेत त्यावर प्रत्येकी एक टाक आहे.
पोहोचण्याच्या वाटा : मुंबईहून नाशिकला जावे, नाशिकच्या सेंट्रल बस डेपोतून सटाण्याला जाणारी बस पकडून खेळदरी गावात उतरावे.
राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : खेळदरी गावातून साधारण ३ तास लागतात.
(संकलन – विष्णू थोरे, चांदवड)
अति प्राचीन असा हा किल्ला आहे एकदा आवश्य भेट द्या,
आपल्या संस्कृतीचा असा प्रसार खूप महत्त्वाचा आहे
माहिती टाकल्यामुळे मनापासून आभार,