असा असावा वाढदिवस – मुलाने दिली वडिलांनी ऑक्सिजन पार्कची भेट
नाशिक – आजकाल आईवडिलांकडे बोज म्हणून पाहणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे असंख्य मुले आपणाला समाजात पहायला मिळतात. अगदी त्यांना वृध्दाश्रमापर्यत धाडणारेही अनेकजण आहेत,पण अशाही स्थितीत आपल्या वडिलांप्रति आदर व्यक्त करणारे श्रावणबाळही समाजात आहे, निझर या मूळ गावचे व सध्या गुजराथ मधील तापी जिल्ह्यातील सोनगड येथे स्थायिक असलेले राकेश पटेल यांनी वडील ओंकार पटेल व भगिनी मालवीबेन यांच्या वाढदिवसानिमित्त शहादा भागात चक्क ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. त्यांच्या या पार्कला मित्रांची साथ लाभल्याने हा पार्क अनोखा ठरत आहे.
जन्माला आलो आहेत तर निसर्गासोबत वेगळ्या पध्दतीने आनंद साजरा करावा, या उदात्त हेतूने या पार्कची निर्मिती करण्यात आली.सोनगडच्या देसरा कॉलनी परिसरातील गणेश मंदिर परिसर आणि त्या शेजारच्या डोंगरावर राकेश पटेल कुटुंबाने सुमारे ३०० झाडांची रोपे लावून अनोख्या पध्दतीने वडील व भगिंनींचा वाढदिवस साजरा केला. पर्यावरण जनजागृतीसाठी राकेशभाईंनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन वर्षात सहाशेहून अधिक झाडे लावल्यानंतर मंदिरालगत असलेल्या टेकडीला ऑक्सिजन पार्क असे नाव देण्यात आले आहे. सोनगडच्या या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावून जंगल तयार करण्यासह तसेच सूर्योदय व सूर्यास्ताच्या नैसर्गिक देखाव्याचा आनंद घेण्याच्या दृष्टीने राकेशभाई प्रयत्न करीत आहेत. सोबत पालिकेनही मदतीचा हात देत व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. हा पार्क नागरिकांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यासाठीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या नैसर्गिक टेकडीला (ऑक्सिजन पार्क) भेट देण्यासाठी पर्यावरण प्रेमी व नागरीक गर्दी करतात. राकेशभाईंनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत दोन वर्षात पूर्णत्वास नेला आहे. पर्यावरण जनजागृती करण्यापेक्षा प्रत्यक्ष साकारण्याची किमया करणारे पटेल व त्यांना मदतीचा हात देणाऱ्या मित्र परिवाराचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.