नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या पुढाकाराने एका ब्रेन डेड रुग्णाचे अवयव दान करण्यात आले. रुग्णालय प्रशासन आणि रुग्णाच्या कुटुंबियांच्या या कौतुकास्पद निर्णयामुळे रुग्णाचे एक मूत्रपिंड, एक किडनी, यकृतचा एक भाग, त्वचा, दोन डोळे असे एकूण सात अवयव इतर सात रुग्णांना त्यामुळे मिळाले.रूग्णाला घरातच पडल्याने मेंदूत अतिरक्त स्त्राव होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ शेखर चिरमाडे यांनी रुग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया केली, तत्कालीन शास्त्रक्रिये नंतरही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ च्या शासकीय नियमावलीनुसार रुग्णाला ब्रेन स्टेम डेड कमिटीने मेंदूमृत घोषित केले. त्या नंतरची रुग्णालयाची भूमिका महत्वाची ठरली. रुग्णाच्या कुटुंबियांना मेंदूमृत असणे या स्थितीपासून ते अवयव दानाच्या प्रक्रिये पर्यंत सगळी प्रक्रिया समजावण्यात समन्वयक अमोल दुगजे यांनी महत्वाची भूमिका निभावली असल्याची माहिती अशोका हॅास्पिटलच्या प्रशासनाने दिली.
यकृताचा एक भाग २ वर्षाच्या लहान बाळाला
अवयव दानातील यकृताचा एक भाग २ वर्षाच्या लहान बाळाला देण्यात आल्याने बाळ आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यातील हा दिवस महत्वपूर्ण मानला जातो आहे. मेंदूमृत रुग्णाच्या कुटुंबाचा हा निर्णय अतिशय प्रशंसनीय आहे. अनेक रुग्ण मेंदूमृत होत असतात पण अवयव दानाचा निर्णय खूप कमी कुटुंबीय घेतात. एक मेंदूमृत रुग्ण अनेक रुग्णाचे प्राण वाचवून आपल्यात कायम जिवंत राहू शकतो. या बद्दल समाजात जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे हॅास्पिटलतर्फे सांगण्यात आले.
समन्वय साधून अवयव दान
रुग्णालय प्रशासन, रुग्णाचे कुटुंबीय, पोलीस प्रशासन आणि सरकारी प्रशासन यांच्यातील समन्वय साधून अवयव दान करण्यात आले. यात रुग्णालयाचे क्लस्टर हेड सचिन बोरसे, मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख, ऑपेरेशन हेड डॉ सागर पालवे, मार्केटिंग हेड श्री समीर तुळजापूरकर, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ सारंग गोयल ,मेंदूरोग तज्ञ डॉ तेजस साकळे, डॉ सुजित भामरे, डॉ केतनकुमार ठोंबरे, डॉ नागेश अघोर, डॉ किशोर टिळे, डॉ कश्मिरा भट आदींचे सहकार्य लाभले.