नवी दिल्ली – साडीमध्ये महिला ग्रेसफुल दिसतात असं सारेच म्हणतात. साडी नेसायची पण एक विशिष्ट पद्धत असते. त्या पद्धतीने ती नेसली गेली की महिला नक्कीच सुंदर दिसतात. सध्या आपण पाहतो त्या साडीतील महत्त्वाचा भाग म्हणजे पदर. आपण ज्या पद्धतीने उलटा पदर घेतो, ती पद्धत कोणी दाखवली याचा तुम्हाला काही अंदाज आहे का? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली. गुरुवारी झालेल्या विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय महिलांना अशाप्रकारे उलट्या पदराची साडी नेसण्याची माहिती रवींद्रनाथ टागोर यांचे ज्येष्ठ बंधू आणि देशातील पहिले आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ यांच्या पत्नी ज्ञाननंदिनी देवी यांनी दिली होती. त्यांनीच स्त्रियांना डाव्या खांद्यावर पदर घेण्यास शिकवले.
शांती निकेतन येथील विश्वभारती विश्वविद्यालयाच्या शताब्दीपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमातच मोदींनी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच त्यांचे गुजरातसोबत असलेले कनेक्शनही सांगितले.
रवींद्रनाथ टागोर यांचे ज्येष्ठ बंधू नोकरीनिमित्त अहमदाबादला होते. तेथेच त्यांच्या पत्नीने उजव्या खांद्यावर पदर घेतलेल्या महिला पाहिल्या. गुजरातमधील महिला साडीचा पदर सुलट म्हणजेच उजव्या खांद्यावर घेतात. पण या महिलांना काम करताना खूप त्रास होत असे. हा त्रास कमी व्हावा यासाठी ज्ञाननंदिनी देवी यांना डाव्या खांद्यावर पदर घेण्याची कल्पना सुचली असावी, असे पंतप्रधान म्हणाले. महिला संघटनांनी यावर अधिक संशोधन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
1863 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या ज्ञाननंदिनी देवी या पहिल्या भारतीय होत्या. इंग्लंड तसेच मुंबईतील आपल्या अनुभवांच्या आधारे साडी नेसण्याची पद्धत विकसित केली, जी आजही भारतात प्रचलित आहे. ब्राह्मसमाजच्या महिलांनी अशा पद्धतीने साडी नेसण्यास सुरुवात केल्याने त्याला ब्रह्मिका साडी असेही म्हणतात.