काठमांडू : राज्यागणिक आणि संस्कृतीनुसार प्रत्येक ठिकाणी सण साजरे करण्याची पद्धत वेगळी असते. पण नेपाळमध्ये तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी चक्क कुत्र्यांची पूजा केली जाते. कुत्र्यांना हार घालून त्यांची पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवणही दिलं जात. माणूस आणि कुत्र्याच्या नात्याच्या आधारे हा सण साजरा केला जातो. या सणाला ‘कुकूर तिहार’ असं म्हटलं जात.
पहिला दिवस कावळ्यांचा
परंपरेनुसार नेपाळमध्ये दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते. पहिल्या दिवशी काग तिहार म्हणजेच कावळ्यांची पूजा केली जाते. सण म्हणून हा दिवस साजरा केला जात असला तरी हा दिवस नेपाळमध्ये दुःख तसेच निराशेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक गोडाधोडाचं जेवण करून ते घरासमोर ठेवून देतात. जेणेकरून ते खाऊन कावळे त्यांना आशीर्वाद देतील.
कुत्र्यांना मानले जाते यमराजाचे दूत
कुकूर तिहारच्या दिवशी नेपाळमध्ये पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांची पूजा केली जाते. कुत्रे हे यमराज अर्थात मृत्युदेवतेचे दूत आहेत असे मानले जाते.