सप्तशृंग गड – राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंग गडावर जय्यत तयारी झाली आहे.
राज्यातील सर्व धार्मिकस्थळे आजपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुली झाली आहेत. येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर विश्वस्त संस्थेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले झाले.
सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. दर्शन मार्गावर त्याची आखणी केलेली आहे. यासह मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. ट्रस्टच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून भाविकांना मातेचे दर्शन ८ महिन्यांनंतर मिळाले आहे.
विश्वस्त संस्थेने यापूर्वी शासकीय व आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या कोविड-१९ संदर्भीय मार्गदर्शक तत्वे व सूचनेनुसार उभारलेल्या कोरोना विषाणू संसर्ग – आरोग्य जनजागृती अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपाययोजना व निर्धारित केलेल्या सेवा-सुविधा तसेच प्रक्रियेनुसार श्री भगवती दर्शन सुविधा ही १६ नोव्हेंबक पासून भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले. एकाच वेळी होणारी गर्दी टाळत, आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणेकामी प्रत्येक भाविकांने स्वयंपूर्तीने सहभागी होवून मंदिर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन, केंद्र व राज्य शासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.