नाशिक – सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा रक्कम वसूल करणाऱ्या अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलवर मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळातील बिलांचा मुद्दा अतिशय ज्वलंत असून शहरातील खासगी हॉस्पिटलवर अशा प्रकारे पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिका प्रशासनाकडे अशोका हॉस्पिटलसंदर्भात वारंवार तक्रारी येत होत्या. याच अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ च्या आजारावर उपचार घेण्यासाठी अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे रुग्ण दाखल झाले असता त्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर रुग्णांना आकारले. याबाबत रुग्णांकडून महापालिकेस तक्रार प्राप्त झाली होती त्यात
१) दिलीप संपत आहेर या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २४/०५/२०२० ते दि.७/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख २५ हजार ९१९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकव्हर रुग्णालयास दि.११/०६/२०२० रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.२/०७/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.त्यानंतर दि.१७/०७/२०२० रोजी पैसे परत न केल्यास नियमांनुसार कायदेशीर कारवाई करणे बाबत पत्र देण्यात आले होते.
२)सुरेश लखीचंद लुंकड या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. १६/०५/२०२० ते दि.९/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १६ हजार ९७९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकव्हर रुग्णालयास दि.१७/०७/२०२० रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.०५/०८/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.
३) सचिन नारायण कोरडे या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २८/०५/२०२० ते दि.१३/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने ७७ हजार ९२० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकव्हर रुग्णालयास दि.२०/०८/२०२० रोजी नोटीस देण्यात आली होती.
४)शेख सलीम हाजीसदर मोहंमद या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २६/०६/२०२० ते दि.२०/०७/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख ५९ हजार ६७० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकव्हर रुग्णालयास दि.२८/०८/२०२० रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.०८/०९/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.
त्यानुसार या हॉस्पिटलच्या व्यवस्थापक यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही सदरच्या ४ रुग्णांना जादा आकारलेली एकूण रक्कम ३,८०,४८८/- इतकी परत न केल्याने व्यवस्थापक, अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक यांना अंतिम नोटीस देण्यात आलेली होती. सदर नोटीस अन्वये मुदतीत पूर्तता न केल्याने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल यांनी शासन अधिसूचना दि.२१/०५/ २०२० व दि.३१/०८/२०२० अन्वये दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध असल्याेच स्पष्ट झाले. तसेच उपरोक्त १ ते ४ रुग्ण यांची आकारलेली रक्कम ३,८०,४८८/- मात्र अंतिम नोटीस नुसार मुदतीत परत करण्यात आलेले नाही. त्या रुग्णालय व्यवस्थापना विरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -२००५, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० यातील विविध तरतुदींचा भंग केला असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २ व ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५८ मुंबई नर्सिंग होम (सुधारणा)अधिनियम २००६ चे कलम ७ व १७ (२) अशोका रुग्णालयाचे विरुद्ध लेखा परीक्षक,मनपा नाशिक यांनी मुंबई नाका, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कायदेशीर उत्तर देणार- अशोका हॉस्पिटल
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मधून आज पर्यंत या कोविड महामारित पंधराशे ते सोळाशे पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन समाधानी घरी गेले आहेत. फक्त तीन-चार रुग्ण तक्रार करीत आहेत यात कोणाचा तरी वेगळा उद्देश आहे असे स्पष्ट होते. सदरच्या तक्रारी बद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून नेहमीच सविस्तर उत्तर दिले गेले आहे. शासकीय शुल्क हे फक्त कोविड उपचारासाठी आहेत. परंतु पेशंटला इतर आजारांवरही उपचार करावे लागतात. नाईलाजाने त्याचे शुल्क अधिक आकरावे लागतात. सदर च्या तक्रारी संदर्भात हॉस्पिटल कडून नेहमीच सर्व बिल हे शासकीय नियमानुसार कसे बरोबर आहे व त्यातील (Inclusion व Exclusion) कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासनाकडून काही ऐकण्याची भूमिका घेतली गेली नाही. तरी पण जिथे नाशिकच्या जास्तीत जास्त कोविड रुग्णांना ज्या हॉस्पिटलने बरे केले आहे. त्याच हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल तर्फे कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलचे समीर तुळजापूरकर यांनी सांगितले आहे.
अशोका हॉस्पिटलच काय नाशिक मधिल 98% हॉस्पिटल लबाड आहे तयाना manus काय आहे त्याची कदर नाही तयाची बाजू तर मांडतिल पण मान्य करू नका संपुर्ण लूट चालू आहे गुन्हे दाखल करा 5/7 डॉक्टर जेलमधे टाका .तर सरळ होतील
.