विष्णू थोरे, चांदवड
….
चांदवड – चांदवड नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून मान मिळवणाऱ्या व चांदवड शहरात वेगवेगळी विकासकामे करून लवकरच लोकप्रिय झालेल्या व सध्या उपनगराध्यक्ष या पदावर असलेल्या भूषण कासलीवाल यांच्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेरा नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला. त्यामुळे भूषण कासलीवाल चर्चेत आले असून त्यांच्यावर टाकलेल्या या अविश्वास ठारावावर संशयाचे धुके पसरले आहे.
विद्यमान नगराध्यक्षा रेखा गवळी या आदिवासी प्रवर्गातील अशिक्षित महिला असून त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतला व शासकीय पत्रांवर नगराध्यक्षांच्या सह्या घेऊन कोणत्याही नगरसेवकाला विश्वासात न घेता मनमानी केल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते जगन राऊत, नगरसेवक बाळू वाघ, कांग्रेसच्या नगरसेविका मीनाताई कोतवाल, कविता वाघ, लीलाताई कोतवाल, रवींद्र आहिरे, नवनाथ आहेर, सुनीता पवार,अल्ताफ तांबोळी, देविदास शेलार, इंदूबाई वाघ, जयश्री हांडगे,अशपाक खान आदी तेरा नगरसेवकांनी केला. त्यानंतर अविश्वासाचा ठराव नगराध्यक्षा रेखा गवळी यांच्याकडे दिला आहे.
संशयाचा घेराव
येत्या काही महिन्यात नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्ठात येत असताना ऐन वेळी झालेल्या या ठरावाने शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. हा ठराव आहे की मुद्दाम काही राजकीय घेराव आहे असा काही सूर या चर्चेचा आहे. कारण भूषण कासलीवाल हे भाजप पक्षाचे उमेदवार असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळातच जास्तीत जास्त विकास निधी चांदवड शहराला मिळवून देत विकास कामांचा आलेख वाढता ठेवला आहे. अशातच हा राजकीय सुरुंग लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे . कारण ठरावात त्यांच्याही पक्षाचे उमेदवार सहभागी आहेत. तथापी इतके दिवस आपले कामकाज सर्वांना आवडले असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हा पवित्रा घेतल्याने हा ठराव आहे की संशयाचा घेराव आहे याबाबत आपणच संभ्रमात असल्याचे कासलीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
आता सभेकडे लक्ष
अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर नगराध्यक्षांना सभा बोलावली लागेल. येथे हा ठराव मंजुर झाला तर कासलीवाल यांचे पद जाईल. पण, जर ठराव बारगळला तर कासलीवाल पदावर कायम राहतील. यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे.