मुंबई – विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार तसेच एक पत्रकारितेचा पुरस्कार अलीकडेच जाहीर करण्यात आला आहे. यात ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीसाठी अविनाश कोल्हे यांना पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार आणि चंद्रकांत वानखडे यांना ‘गांधी का मरत नाही’ या ग्रंथासाठी ‘म. म. डॉ. वा. वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तर नितीन नायगांवकर यांना हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान होईल. १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापनदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा होईल.
‘महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय’ या ग्रंथासाठी नामदेव कांबळे हे ‘कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कारा’चे मानकरी ठरले असून ‘वैद्यकशास्त्रातील कालवेध’ या ग्रंथासाठी डॉ. प्रमोद कोलवाडकर यांना ‘य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मनोज सुरेंद्र पाठक यांना ‘दंडविधान’ या काव्यसंग्रहासाठी ‘शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन पुरस्कार’ दिला जाणार आहे, तर ‘वा. ना. देशपांडे स्मृती ललितलेखन पुरस्कार’ ‘गाई गेल्या राना’ या ग्रंथासाठी रवींद्र जवादे यांना घोषित झाला आहे.
गजानन फुसे यांना ‘दिवस बोलू देत नाही’ या काव्यसंग्रहासाठी आणि डॉ. विजय राऊत यांना ‘डॉ. आशा सावदेकर : साहित्यविश्व’ या ग्रंथासाठी नवोदित साहित्यलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कथाकार के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कथेसाठीचा ‘शांताराम कथा पुरस्कार’ ‘संवादसेतू’ या दिवाळी अंकातील ‘निर्णय’ या कथेसाठी डॉ. शुभंकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. नितीन नायगावकर यांना ‘हरिकिसन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार’ देण्यात येईल. कविवर्य ग्रेस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘युगवाणी’ नियतकालिकातील सर्वोत्कृष्ट लेखासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा सुधीर पटवर्धन यांच्या संजय गणोरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीसाठी जाहीर झाला आहे.
‘कवी अनिल यांची संपूर्ण कविता’ या ग्रंथासाठी श्याम माधव धोंड यांना उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. उल्हास साबळे आणि विलास जोशी यांना ‘नक्षत्रगाथा’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला असून विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार वर्धा शाखेला जाहीर झाला आहे.
—