न्यूयॉर्क – साधी दिवाळीची साफसफाई करायची म्हटलं तरी आपल्याला अख्खा दिवस लागतो आणि तिकडे अमेरिकेत १३२ खोल्यांचे व्हाईट हाऊस नवे राष्ट्राध्यक्ष दाखल होण्यापूर्वी पाच तासांच्या आत नटून थटून सज्ज झालेले असते. व्हाईट हाऊसच्या बाबतीत जे एकावे ते नवलच. त्यात आता ही बाब व्हाईट हाऊसचे आकर्षण असलेल्यांसाठी अधिकच कौतुकाची ठरत आहे.
किचनपासून सेमिनारपर्यंत
नव्या राष्ट्राध्यक्षांची एन्ट्री होण्याच्या पूर्वी व्हाईट हाऊसची साफ-सफाई होत असते. जुन्या राष्ट्राध्यक्षांचे सामान बाजुला करून नव्या राष्ट्राध्यक्षांचे सामान लावण्याची कसरत होत असते. नवा गडी नवा राज प्रमाणे त्याच्या आवडीने किचनपासून सेमीनार हॉलपर्यंत प्रत्येक गोष्ट सजवली जाते. पण हे सर्व काम अवघ्या पाच तासांच्या आत केले जाते. अर्थात पाच तासांत संपूर्ण व्हाईटहाऊस बदलले जाते. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन २० जानेवारीला व्हाईट हाऊसमध्ये दाखल होतील. त्याच्या आदल्या दिवसापर्यंत डोनाल्ड ट्रम्प भवनास राहतील. ट्रम्प यांचे शिफ्टींग होताच वेगाने साफसफाई सुरू होईल. परंपरेनुसारच जुन्या राष्ट्राध्यक्षांच्या जाण्यात आणि नव्या राष्ट्राध्यक्षांच्या आगमनात पाचच तासांचे अंतर असते. त्यामुळे तेवढ्या कालावधीत सर्व काम करण्याची यंत्रणेला जणू सवयच पडली आहे.
स्वच्छतेचे कंत्राट नाही
एक्स्प्लोरिंग द व्हाईट हाऊस नावाच्या पुस्तकाच्या लेखक केट एंडरसन यांनी सीएनएनशी गप्पा मारताना सांगितले की ही साफसफाई यासाठी चर्चेत असते कारण इथे कुठल्याही व्यावसायिक एजन्सीला पाचारण केले जात नाही. ते सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे मानले जाते. त्यामुळे रव्ही व्हाईट हाऊसमध्ये राहणारा स्टाफच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतो, असे त्या सांगतात.
कोरोनामुळे डीप क्लिनिंग
नव्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या पुस्तकांपासून ते टूथब्रशपर्यंत प्रत्येक गोष्ट जागेवर मिळेल याची संपूर्ण काळजी घेतली जाते. कोरोनामुळे तर संपूर्ण व्हाईट हाऊसचे डीप क्लिनींग होणार आहे. मुख्य म्हणजे व्हाईट हाऊसमधील सामानांचा एक कॅटलॉग नव्या राष्ट्राध्यक्षांना पाठविला जातो. व्हाईट हाऊसमध्ये एकूण १३२ खोल्या आहेत. यात ३५ बाथरूम, ४१२ दरवाजे, १४७ खिडक्यादेखील आहेत. सहा मजली इमारतीला दोन बेसमेंट, दोन पब्लिक फ्लोअर आहेत. तर इतर फ्लोअर राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरक्षित आहेत. एकावेळी १४० पाहुण्यांसोबत जेवण करता येईल अशी व्यवस्थाही याठिकाणी आहे.
८ वर्षात बांधले होते
आयर्लंडमधील जेम्स होबन याने व्हाईट हाऊसचे डिझाईन तयार केले होते. १७९२ ते १८०० या दरम्यान आठ वर्षांत व्हाईट हाऊस बांधून पूर्ण झाले होते. पूर्वी या जागेवर जंगल होते, असे सांगितले जाते.