लंडन – मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. एखादं लहान मूल खूपच हुशार असेल, तर त्यासाठी ही म्हण वापरली जाते. ब्रिटनमधील एका शीख मुलीसाठी देखील ही म्हण वापरता येईल. आयक्यूसाठी प्रसिद्ध असलेल्या मेन्सा क्लबमध्ये दयाल कौर या मुलीचा समावेश करण्यात आला आहे. बरमिंगहॅम येथे ती आपल्या आई-वडिलांसोबत राहते. खगोलशास्त्रज्ञ होण्याचे तिचे स्वप्न आहे.
दयाल जेव्हा १४ महिन्यांची होती, तेंव्हाच तिने इंग्रजी मुळाक्षरांचा अभ्यास केला. तिला या मेन्सा क्लबमध्ये सहभागी व्हायचे होते. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये तिने या क्लबची ऑनलाईन टेस्ट दिली होती. यात तिला १४५ मार्क्स मिळाले. त्यामुळे तिला देशातील सर्वात लहान प्रतिभावान मुलगी म्हणून गौरवण्यात आले.
या हुशार मुलीला क्लबमध्ये सहभागी करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याचे मेन्सा क्लबचे सीईओ जॉन स्टिव्हनेज यांनी सांगितले. या क्लबमध्ये छोटी छोटी अशी २००० मुले आहेत. या मुलीचे वडील सरबजीत सिंग हे शिक्षक आहेत. तिची कुशाग्र बुद्धिमत्ता ही देवाची देणगी असल्याचे त्यांनी सांगितले. तिचे पालक असणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.