नाशिक : सिडकोतील २७ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी अवघ्या चार तासात पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून, मैत्रीणीची छेड काढून तिला शिवीगाळ केल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली असून संशयीतांना अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
आदित्य दीपक सुतार (रा.सिडको) व राहूल वसंत माळोदे (रा.पाथर्डी फाटा) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. योगेश प्रकाश तांदळे (रा.पंडितनगर) या युवकाची शुक्रवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. संभाजी स्टेडिअम येथे ही घटना घडली होती. मैत्रीणी समवेत गप्पा मारत असतांना मृताने शिवीगाळ करीत टोकल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मैत्रीणींना घरी सोडून परतलेल्या संशयीतांनी तांदळे यास गाठून त्याची निर्घुन हत्या करून पोबारा केला होता. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणा संशयीतांच्या मागावर असतांना युनिट २ चे कर्मचारी योगेश सानप यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. दोघा संशयीतांना सापळा रचून जेरबंद करण्यात आले असून त्यांना अंबड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक वसंत खतेले,अभिजीत सोनवणे,उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे,सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले,राजेंद्र जाधव,हवालदार रमेश घडवजे,शंकर काळे,बाळू शेळके,यशवंत बेंडकुळे,संपत सानप,राजेंद्र घुमरे,संतोष ठाकुर पोलीस नाईक परमेश्वर दराडे,नंदकुमार नांदुर्डीकर,रतन सांगळे शिपाई बाळासाहेब नांद्रे,महेंद्र साळुंखे,योगेश सानप,गौरव गवळी,संतोष माळोदे,यादव डंबाळे,कोमल यादव आदींच्या पथकाने केली.
…