इगतपुरी – गेल्या काही दिवसात बदललेल्या हवामानामुळे शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असतानाच आज झालेल्या पावसाने शेतीची मोठीच हानी झाली आहे. धामणी येथील शेतकऱ्याची दीड एकर टोमॅटोची बाग अवघ्य़ा काही मिनिटातच भुईसपाट झाली आहे. परिसरातील सर्वच शेतीची हीच स्थिती आहे.
बेमोसमी पावसामुळे शेतीवर बुरशीजन्य व करपा घुबडा आदी रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये निसर्गाचे चक्रमान बदलल्याचे दिसून येत आहे. अवेळी पाऊस, वाढती उष्णता,आणि थंडी देखील अनिश्चित बनली आहे. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत तोच शेतीलाही फटका बसतो आहे. खरीप हंगामाची जमापुंजी पै-पै जमा करून शेतकऱ्यांनी रब्बीतील पीक कसेबसे उभे केले होते.
बेमोसमी अवकाळी पावसाने संपूर्ण टोमॅटोची बाग भुईसपाट झाली आहे. टोमॅटोच्या ‘विरांग’ वाणाची लागवड करून पोटच्या मुलाप्रमाणे शेतकऱ्याने टोमॅटोचे पीक वाढवले. टोमॅटो काढणीसाठी नुकतेच आले होते. त्यामुळे एकंदरीत तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पहाटे झालेल्या पावसाने केलेली दुर्दशा पाहून शेतकऱ्यांचे अक्षरशः तोंडचे पाणी पळाले आहे. वेगवेगळी कीटकनाशके,बुरशीनाशके फवारून अपेक्षेप्रमाणे बाग फुलवली होती परंतु अवकाळीची नजर लागून पदरी निराशाच पडली आहे. अन्य शेतकऱ्यांचीही अशीच गत आहे.
—
प्रचंड मेहनत व काबाडकष्ट करून अपेक्षेप्रमाणे टोमॅटोचा प्लॉट बनवला होता. पावसामुळे संपूर्ण दीड एकर शेती भुईसपाट झाली असून आता भांडवल देखील फिटणार नाही.
– सागर भोसले, नुकसानग्रस्त शेतकरी,धामणी