मुंबई – राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे.
नाशिक जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान द्राक्ष पिकांचं झालं आहे. एकूण 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष जवळपास फेकण्याची वेळ आली आहे. त्या खालोखाल 3 हजार 300 हेक्टर क्षेत्रावरील कांदा आणि अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि हरभऱ्याचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान निफाड, दिंडोरी, सटाणा या तालुक्यात झालं आहे.
गतवर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्याफतला द्राक्ष हंगाम यंदा महिनाभरानं लांबला आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच दोन दिवसांपासून तालुक्यांच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला. कासेगाव, लक्ष्मीटाकळी, खर्डी, कोर्टी, सरकोली परिसरात झालेल्या या पावसामुळे या परिसरातल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे.
नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात काही ठिकाणी काल गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या या पावसानं पिकांना मोठा फटका बसणार असून यामुळं शेतकऱ्यांमध्ये चितेचं वातावरण निर्माण झालं आहे.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात तडेगाववाडी इथं काल पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात मका गोळा करत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यात काल संध्याकाळी साक्री तालुक्यात काटवान आणि दहिवेल भागात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट झाली. पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, हरभरा आणि गहू पिकाचं नुकसान झालं आहे. आंब्याचे मोहर गळून पडले. तर धुळे तालुक्यात नेरसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुळे शहरातही सायंकाळी साडे सात वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला असून गारठा वाढला आहे.
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून सर्वत्र पाऊस होत आहे. या बेमोसमी पावसामुळे गव्हू, हरभरा, करडई, ज्वारी, कापूस, टरबूज, खरबूज, आंब्यासह भाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालं आहे. काल किनवट तालूक्यातल्या सिंदखेडा शिवारात एकाज् गुराख्याच्या अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र पहाटे पाच वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गहू, हरभरा, हळद, तुर या पिकांना मोठा फटका बसणार आहे. अनेक भागात हरभऱ्याची काढणी सुरू आहे. हळद काढून वाळायला टाकलेली आहे. अशा परिस्थितीत पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.