निलेश गौतम, डांगसौंदाणे (ता. बागलाण)
बागलाणच्या पश्चिम पट्टयातील तळवाडे दिगर सह परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ९५ रुपये दराने व्यापाऱ्याला दिलेला द्राक्ष आज कुणी ९५ पैसे किलोने घ्यायला तयार नाही. ‘काल सोनं होतं आज माती झाली’, असे शेतकरी सांगत आहेत.
अवकाळी पावसामुळे तळवाडे दिगर सह परिसरातील ६० ते ७० एकरावरील द्राक्षांच्या मण्यांना तडे गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सलग दुसर्या वर्षीही अवकाळीने फटका दिल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. परिसरात सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व दाट धुक्याचा फटका बसून काढणी योग्य व काढणी सुरु असलेल्या द्राक्ष मण्यांचे सुमारे एक ते दीड कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेतकऱ्याने मांडली कैफियत
भास्कर ठाकरे या शेतकऱ्याने सांगितले की, गावातील सर्वोत्कृष्ट बाग तयार केली. पाहताच क्षणी कोणाच्याही डोळ्यात भरतील अशी दोन एकरची द्राक्ष बाग होती चार दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांनी मला अपेक्षित असलेला ९५ रुपये दर दिला. त्याचदिवशी नमुना म्हणून अर्धा टन द्राक्ष व्यापाऱ्याने काढून नेला. उर्वरित द्राक्षाचा माल हा दोन दिवसात काढून नेतो, असं सांगितलं. २० ते २५ लाख रुपये हमखास घडतील या आशेने मी आणि माझे कुटुंब निश्चिंत होतो, मात्र शुक्रवारी सकाळीपासून वातावरणात होत असलेला बदल आणि त्यासोबतच होत असलेल्या अवकाळी पावसाने माझं सर्व स्वप्न चकनाचूर करून गेला. ४ दिवसांपूर्वी २५ लाखांचे मूल्य असलेला माझा द्राक्ष बाग आज २५ रुपये उत्पन्न देणारा राहिला नाही. होत्याचे नव्हते झाले. घरात गेले तर जेवण जात नाही. बाहेर आले तर डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. हतबल झालो. आता खूप झाले, नको ही शेती, अशी भावनिक साद देत तळवाडे दिगरचे भास्कर (काळू नाना) ठाकरे या युवा शेतकऱ्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
सलग दुसऱ्या वर्षी
यंदा लांबलेला पाऊस, त्यानंतर दर महिन्याला होत असलेले वातवरणीय बदल यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तळवाडे दिगर येथील भास्कर ठाकरे,पंकज ठाकरे,हेमंत पवार,मुरलीधर पवार,चंद्रकांत आहिरे,श्रावण ठाकरे,बाजीराव पवार,कृष्णा रौदळ,मंगेश पवार,भिका आहिरे,नामदेव आहिरे,लक्ष्मण पवार आदी शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या द्राक्ष बागा कवडीमोल झाल्या आहेत.
—
द्राक्ष शेती मोठ्या जोखीमीचा बनली आहे. निसर्गाशी दोन हात करत अर्ली द्राक्षे पिकविणारे गाव म्हणून तळवाडे दिगरची ओळख आहे. मात्र सतत दोन वर्षांपासून अवकाळीमुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
– पंकज ठाकरे, शेतकरी
बघा दोन्ही व्हिडिओ