बलात्कार प्रकरणी अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल
नाशिक : सेल्फी फोटो व्हायरल करण्याची तसेच आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन युवकाने एका मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार जुने नाशिक भागात घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयीत १७ वर्षीय मुलास पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ३१ आॅगष्ट २०१९ रोजी मुलगी रस्त्याने पायी जात असतांना संशयीताने तिचा पाठलाग करून मैत्री केली. यावेळी त्याने आपल्या मोबाईलवर सेल्फी फोटो काढला. त्यानंतर मुलीचे आई वडिल घरी नसल्याची संधी साधत त्याने घरात घुसून सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बळजबरी बलात्कार केला. सलग दोन वर्षा पासून संशयीत मुलीस घरात गाठून सेल्फी फोटो बाबत आणि आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्कार करीत होता. अधिक तपास उपनिरीक्षक अनवणे करीत आहेत.
…
दांम्पत्यास भरधाव कारची धडक, वृध्द पतीचा मृत्यू
नाशिक : शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दांम्पत्यास भरधाव कारने धडक दिल्याची घटना चेतनानगर भागात घडली. या घटनेत वृध्द पतीचा मृत्यु झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक दिलीप आहिरे (७० रा.पुजा अपा.कर्मा बिल्डींग जवळ) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव असून त्यांच्या पत्नी लता आहिरे (६५) या जखमी आहेत. आहिरे दांम्पत्या बुधवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. परिसरातील कर्मा बिल्डींगकडून गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाकडे ते पायी जात असतांना गजानन ट्रेंडिक कंपनी या दुकानासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०६ एझेड ६१४४ या कारने दोघांना धडक दिली. जखमी अवस्थेत दांम्पत्यास रूग्णालयात दाखल केले असता अशोक आहिरे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नंदकुमार खैरणार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
….
पैश्यांची परतफेड केली नाही म्हणून बेदम मारहाण
नाशिक : पैश्यांची परतफेड केली नाही या कारणातून एकास बेदम मारहाण करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना बजरंगवाडी येथे घडली. याप्रकरणी संशयीतास पोलीसांनी अटक केली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुमताज साकीर अन्सारी उर्फ गुड्डू प्लंबर (रा.मशिदीमागे,बजरंगवाडी) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी रिझवान अन्वर अहमद (रा.नानावली) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. अहमद कुटूंबियांनी अन्सारी याच्याकडून चार हजार रूपये हात ऊसनवार घेतले होते. याची परतफेड रिझवानचा भाऊ इस्तियाक अहमद याने केली होती. रिझवान बुधवारी (दि.३) परिसरातून जात असतांना त्यास अन्सारी भेटला. त्याने पैसे मिळाले नसल्याचे सांगितल्याने रात्री दोघे भाऊ अन्सारीच्या घरी गेले असता ही घटना घडली. परतफेड केलेली असतांना संशयीताने नाकबूल जात मला पैसे द्या नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी संतप्त अन्सारी याने इस्तियाक यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फावड्याचा लाकडी दांडा उचलून इस्तियाकच्या डोक्यात मारला या घटनेत इस्तियाक गंभीर जखमी झाला असून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत