ग्वालियर – डोक्याने सटकलेले तरुण कुठल्या क्षणी कोणते पाऊल उचलतील याचा नेम नाही. देशात दररोज अशा माथेफिरूंच्या उटपटांग घटना कानावर पडत असतात. अलिकडेच मध्यप्रदेशात मुरैना जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवले तर नवरदेवाने चक्क सालीचेच अपहरण केल्याचे समोर आले आहे.
मुरैना येथील पोरसा तालुक्यात पद्दूपुरामध्ये १४ वर्षे सात महिन्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत विनोद सखबार या तरुणासोबत लग्न ठरले. गुरुवारी रात्री मुलीच्या घरी वरात आली तेव्हा प्रशासनाला माहिती मिळाली की अल्पवयीन मुलीचे लग्न होत आहे. मुरैना येथील महिला व बाल विकास विभाग तसेच चाईल्ड लाईनची टीम पोलिसांसोबत विवाहस्थळी पोहोचली. या टीमने लग्न थांबवले. पोलीस मुलीला वन स्टॉप सेंटरवर घेऊन गेले. पण नवरदेवाला अपमान सहन झाला नाही.
मुलीची मावस बहीण शकुंतला हिच्या मध्यस्थीने हे लग्न ठरले होते. त्यामुळे शकुंतलाचेही डोके आऊट झाले. दोघांनी मिळून षडयंत्र रचले आणि मुलीच्या लहान बहिणीचे अपहरण केले. तिचे वय अवघे १२ वर्षे. मुळात मुलीला पोलीस घेऊन गेल्यामुळे तिच्या लहान बहिणीसोबत लग्न लावून द्यावे, अशी नवरदेवाची आणि शकुंतलाची अपेक्षा होती. पण तसे घडले नाही म्हणून नवरदेवाने थेट सालीचे अपहरण केले व तिला घेऊन फरार झाला. त्याच्यासोबत शकुंतलानेही पळ काढला. पोलिसांना माहिती मिळताच शोध सुरू झाला. जवळपास पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी साली आणि शकुंतलाला शोधून काढले. मात्र नवरदेव अद्याप फरार आहे. नवरदेव, शकुंतला आणि काही नातेवाईकांवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.