नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलकैदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे. शनिवारी (१९ सप्टेंबर) पहाटे केरळमधील एर्णाकुलम आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं एकाच वेळी कारवाई करत या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं आहे.
देशात पश्चिम बंगाल आणि केरळसह विविध ठिकाणी पाकिस्तान प्रायोजित अलकैदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया सुरू असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती, त्यानुसार छापे टाकून ही अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यातल्या तीन दहशतवाद्यांना केरळमधून तर सहा दहशतवाद्यांना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून निरपराधांची हत्या करण्याचा त्यांचा कट होता आणि यासाठी निधी मिळवण्यात ते सक्रीय होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या संख्येनं डिजिटल उपकरणं, दस्तावेज, जिहादी साहित्य, धारदार शस्त्र, स्वदेशी बनवाटीच्या बंदुका, स्थानिक बनावटीचं चिलखत तसंच घरामधे विस्फोटकं तयार करण्यासंदर्भातले लेख आणि साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.