– शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे कर्मयोगीनगरमध्ये भूमिगत केबलचे काम पूर्ण
– कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगताप नगर रहिवाशांची खंडित वीजपुरवठ्यातून झाली सुटका
नाशिक – सर्वत्र महावितरण कंपनीविरुध्द संताप व कर्मचा-यांना मारहाणीच्या घटना घडत असतांना नाशिकच्या कर्मयोगीनगरमध्ये रहिवाशांनी महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा व कर्मचा-यांचे आभार व्यक्त करत त्यांना पुष्पगुच्छ दिले. शिवसेना व सत्कार्य फाऊंडेशनच्या पाठपुराव्यामुळे कर्मयोगीनगरमध्ये भूमिगत केबलचे काम पूर्ण झाले. या कामामुळे पाच हजार रहिवाशांची खंडित वीजपुरवठ्यातून सुटका झाली. या कामाची पाहणी करत असतांना अधिकारी आले असता नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.
या भागात महावितरण कंपनीने सुमारे पंधरा लाख रुपये विशेष निधी खर्च करून सातशे मीटर भूमिगत केबलचे काम केले. उच्चदाबाची मुख्य वाहिनी कार्यान्वित करून विद्युत पुरवठ्याची विभागणी करण्यात आली. यामुळे उंटवाडीतील कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर या भागातील सुमारे पाच हजार रहिवाशांची सततच्या खंडीत विद्युत पुरवठ्यातून सुटका होणार आहे.
नाशिकच्या उंटवाडी, जगतापनगर, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, तिडकेनगर आदी भागात गेल्या काही वर्षांपासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते, परिसरातील रहिवाशी यांनी याबाबत वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकार्यांना वेळोवेळी ही समस्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी केली. तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर १७ ऑक्टोबर २०२० रोजी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, सहाय्यक अभियंता प्रदीप गवई, वायरमन दीपक शिर्के, किशोर वाघ यांनी रहिवाशांसह परिसरात ठिकठिकाणी पहाणी केली. नागरिकांच्या भावना जाणून घेवून समस्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.