नाशिक: एकीकडे गॅसची दरवाढ आणि दुसरी कडे उज्वला या फसव्या योजनेचे मध्ये १ कोटी गॅस कनेक्शन वाटण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. केंद्रिय अर्थमंत्री महिला असताना देखील या बजेट मध्ये महिलांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतला गेला नाही याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली भगूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी बलकवडे म्हणाल्या की, अर्थसंकल्पात इंधन दरावर अधिभार लावण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनतेवरच भार टाकला. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून सरकार गॅसचे कनेक्शन तर देते मात्र त्याच गॅसचे दर आज मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवलेले असल्याने, सर्वसामान्य व मजूर लोकांना त्या गॅसचे सिलेंडर भरून वापरण्या पासून वंचित राहावे लागते. अशी परिस्थिती असताना अजून फक्त गॅसचे कनेक्शन वाटून सरकारला सर्वसामान्य जनतेच्या तुटपुंज्या कमाईवर देखील दरोडा घातला आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस च्या जिल्हाध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे यांनी चूल मांडून त्यावर उज्ज्वला योजनेच्या गॅसची शेगडी ठेऊन स्वयंपाक व्यवस्था मांडली होती. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला सायरा शेख, गायत्री झांजर, संगिता उमापसह महिला उपस्थित होत्या.