कळवण – साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तश्रृंगी गडावरील जवळपास ३७४ हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत असून अवघ्या ९ हेक्टर क्षेत्रात सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायती अंतर्गत येते त्यात सप्तश्रृंगी गड गाव वसलेले असून उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या सप्तश्रृंगी गडावर दिवसेंदिवस भाविकांची झपाट्याने गर्दी वाढते तशी गावाची लोकसंख्येतही वाढ असल्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाच्या विकासासाठी भरीव तरतूद केली असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
२०२१-२२ च्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आमदार नितीन पवार यांना यश आल्यामुळे सप्तश्रुंगी गडाचा कायापालट होणार असल्याने आदिमायेच्या भाविक व सप्तशृंगगडवासीयांनी आनंद व्यक्त करीत निर्णयाचे स्वागत केले आहे .
देशातील शक्तिपीठांपैकी एकमेव स्वयंभू शक्तिपीठ असलेला सप्तशृंगगड २००१ पासून ‘ क ‘ वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे .सप्तश्रुंग गडावर येणाऱ्या भाविकांच्या तुलनेत उपलब्ध सुविधांची कमतरता असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते अंतर्गत रस्ते आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते . भगवती मंदिर परिसरातील विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून अतिशय अल्प निधी मिळतो त्यामुळे कामे करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्यामुळे सप्तश्रुंगी गड तीर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी व माजी सरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सप्तशृंगगडास ‘ ब ‘ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे .
तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सप्तशृंगगडास सुमारे २५ कोटींचा निधी प्राप्त होणार असल्याने याबाबत सुमारे चार वर्षांपासून सप्तश्रुंगी गडावरील विविध विकासकामांचा प्रस्ताव व विकास आराखडा विविध पातळ्यांवर सादर केल्यानंतर त्यातील त्रुटी , दुरुस्ती करून मंत्रालय स्तरावर कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. लालफितीच्या कारभारातून सप्तश्रुंगी गडावरील विकासकामांचे प्रस्तावांची सोडवणूक व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री भुसे , परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे आमदार नितीन पवार यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी दिली.
सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतुद केल्याच्या निर्णयाचे सरपंच रमेश पवार , उपसरपंच जयश्री गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके , राजेश गवळी आदींनी स्वागत केले.
सप्तश्रुंगी गडाच्या विकासासाठी सप्तश्रृंगी गड ग्रामपंचायत व सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रयत्नशिल असून. सप्तश्रृंगी गडावरीलपाणी टंचाई, अंतर्गत रस्ते,पाणी पुरवठा योजना , जलवाहिनी , सुलभ स्वच्छता गृह , निवारा शेड , भक्तनिवास , बसस्थानक , गावातंर्गत सर्व रस्त्यांचे क्रांकीटीकरण , मुख्य रस्त्यावर डोम, निवारा शेड , व्यावसायीक गाळे , भाविकांसाठी चिंतन हॉल व प्रतिक्षा गृह , सुसज्ज रुग्णालय आदी कामांचा विकास आराखडा तयार असून मंजुरीसाठी अतिम टप्प्यात आहे .
आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नामुळे निधीची तरतूद
श्रीक्षेत्र सप्तशृंगगड विकास आराखडा तीन वर्षापासून शासनस्तरावर प्रलंबित आहे . सातत्याने पाठपुरावा सुरु असून आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नामुळे आता खऱ्या अर्थाने निधीची तरतूद होणार आहे.महाविकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केल्यामुळे आभारी आहोत.
-राजेश गवळी , ग्रामपंचायत सदस्य
अर्थकारणालाही मोठी चालना मिळणार
सप्तशृंगगडाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने भाविक व पर्यटकांना सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याबरोबरच भाविक व पर्यटकांच्या गर्दीत वाढ होऊन गड व परिसरातील अर्थकारणालाही मोठी चालना मिळणार आहे .
-संदीप बेनके , ग्रामपंचायत सदस्य