अलिबाग – आर्किटेक्टला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील शाळेत रात्र काढावी लागली. या शाळेस कोरोना काळातील जेलचे स्वरूप देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील कोर्टाने त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली असता, कोणत्याही प्रकारे चौकशी करू नये असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहेत. वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना दवाखान्यात नेले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वैद्यकीय चाचणी नंतर त्यांना अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नेण्यात आले व त्यांनी तिथेच रात्र घालवली. या शाळेस अलिबाग जेलचे कोरोना केंद्र बनवण्यात आले आहे. आर्किटेक्ट अन्वय नाईक आणि त्यांच्या आई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या बद्दल भारतीय दंड विधान कलम ३०६ आणि ३४ अन्वये तक्रार नोंदवण्यात आली आहे. अर्णब यांनी कामाची संबंधित रक्कम थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे अन्वय नाईकने पत्रात म्हटले आहे. याअंतर्गत फिरोज मोहमद शेख आणि नितीश सारदा यांना १८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या जामिनावर आज निकाल येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.