नवी दिल्ली – राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कारांच्या सातपैकी चार श्रेणींच्या बक्षिसाची रक्कम वाढवण्याची घोषणा केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराची रक्कम ७.५ लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात आली आहे, अर्जुन पुरस्कार ५ लाखांवरून १५ लाख रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी द्रोणाचार्य (आजीवन पुरस्कार) पुरस्कार विजेत्याला ५ लाख रुपये देण्यात येत होते आता यात वृद्धी करून ते रोख १५ लाख रुपये करण्यात आले आहेत, तर द्रोणाचार्य (नियमित) पुरस्कारासाठी प्रत्येक विजेत्याला रोख रक्कम ५ लाख रुपयांऐवजी १० लाख रुपये दिले जातील. ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना ५ लाखांच्या ऐवजी १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयाबद्दल बोलताना रिजीजू म्हणाले, “क्रीडा पुरस्कारासाठीच्या बक्षिसाच्या रकमेचे २००८ मध्ये पुनरावलोकन करण्यात आले होते. कमीतकमी दर दहा वर्षांनी एकदा या रकमेचे पुनरावलोकन केले पाहिजे. जर प्रत्येक क्षेत्रातील व्यावसायिकांच्या उत्पनात वाढ झाली आहे तर आमच्या खेळाडूंच्या का होऊ नये. ”