मुंबई – रेल्वेच्या प्रवासात जनरल डब्ब्यात घामाघूम होऊन प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आता प्रशासन सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण अत्यंत तुच्छ नजरेने बघितले जाणारे जनरल डब्बेही आता वातानुकुलित करण्याची तयारी सुरू झाली आहे. अर्थात या सर्व डब्यांमध्येही एसी असणार आहे. रेल्वे प्रशासनाने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
रेल्वे मंत्रालयातर्फे वेगवेगळ्या पातळ्यांवर नियोजन सुरू आहे. त्यात एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचाही विचार सुरू आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत भारतीय रेल्वे वातानुकुलित जनरल डब्बा आणि सेकंड क्लास कोच लॉन्च करेल. याशिवाय वेगही वाढलेला असेल.
रेल्वेने पहिलेच इकॉनॉमी एसी ३ टायर कोच लॉन्च केलेले आहेत. आता लवकरच सेकंड क्लास कोचमध्येही पूर्णपणे एसी असतील. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा रेल्वे प्रवास सुखद होणार आहे. एसीचे जनरल कोच कपूरथला रेल्वे कोच फॅक्ट्रीत निर्माणाधीन आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत हे डब्बे रुळावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासन युद्ध स्तरावर कामाला लागले आहे.
या बदलांमुळे भारतातील रेल्वेचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवास करणाऱ्यांना एसीचा प्रवास अत्यंत सोयीचा ठरणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता नोंदविली जात आहे.
यापूर्वी २०१६ मध्ये रेल्वेने दिन दयालू कोच रुळावर उतरविले होते. त्यात लगेज रॅक, पॅडेड सीट, मोबाईल चार्जिंग पॉईंट आदी सुविधा देण्यात आल्या होत्या. वातानुकुलित जनरल डब्ब्यांचे डिझाईनदेखील तयार झाले आहे. जनरल डब्ब्यात एकावेळी १०० प्रवासी बसतात. पण, वातानुकुलित झाल्यानंतर ही क्षमता आणखी वाढविण्यात येणार आहे.
पहिले एक्स्प्रेसमध्ये
हे वातानुकुलित जनरल डब्बे सुरुवातीला लांबच्या पल्ल्यावर धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेसमध्ये लावले जातील. या गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतील. त्यानंतर हळूहळू सर्वच गाड्यांमध्ये जनरल वातानुकुलित जनरल डब्बे लागलेले असतील.