रशियातील पितेरबुर्गमधील ‘रवींद्रनाथ टागोर स्कूल’ नावाचे समृध्द विद्यापीठ
…
भारत आपल्या स्वातंत्र्याची दशकपूर्ती साजरी करत असतांनाच रशियातील पितेरबुर्गमध्ये एका हिंदी शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात येते. अतिशय वरिष्ठ पातळीवर झालेला हा निर्णय असतो. सोव्हिएत युनियनचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांची भारत भेट आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची सोव्हिएत देश भेट या भेटींदरम्यान हा निर्णय झालेला असतो…आजही या शाळेत हिंदी शिकवले जाते…भारत–रशिया मैत्रीचे धागे अतुट आहेत याचीच या शाळेच्या भेटीदरम्यान पुन्हा एकदा प्रचीती आली…आज ती रशियातील कदाचित एकमेव हिंदी शाळा ठरावी…शाळेसाठी सर्वकाही अशीच भावना इथल्या फक्त प्रशासनाचीच नाही तर शिक्षक, विद्यार्थी आणि अगदी पालकांचीही असल्याने शाळेने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे… या शाळेत रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे १८ मार्च २०२१ रोजी, भारतीय वाणिज्य दूत दीपक मिगलानी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे, त्यानिमित्त सांक्त पितेरबुर्गच्या रवींद्रनाथ टागोर हिंदी स्कुल न. ६५३ विषयी थोडेसे…
विद्या स्वर्गे, रशियन भाषा विभागप्रमुख,
रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्र, मुबई
…….
साधारणतः दोन वर्षांपूर्वी मुंबईत पितेरबुर्ग इथल्या शाळेचा एक गट रशियन सेंटरला आला होता. नेहमीच येणारे असे अभ्यागत, त्यामुळे असेल कदाचित आम्ही नेहमीप्रमाणेच तयारीत होतो. पण शाळेच्या या पाहुण्यांमध्ये काही विद्यार्थीही सहभागी होते. त्यामुळे त्यांचा एक कार्यक्रम मुंबईतील वॉलसिंघम हाऊस स्कूलमध्ये ठरवला. रशियन मुलांच्या हिंदी गाण्यावरील नृत्य कार्यक्रमानंतर त्या मुलांनी म्हटलेल्या दोन्ही देशाच्या राष्ट्रगीतानंतर सर्वच भारावून गेले. पुढे हीच ओळख गाढ मैत्रीत होईल असे मात्र काही वाटले नव्हते. परंतु कुटुंबासोबत जेव्हा रशिया दौरा विशेषतः पितेरबुर्गला भेट दयायचे ठरले, तेव्हा जाण्याआधी सहज त्या शाळेची डायरेक्टर इलेना शुबिना यांना मी येत असल्याचा दोन ओळींचा फक्त मेल केला. “तू फक्त कधी येतेय सांग आणि शाळेला तुला नक्की भेट द्यायची आहे” या दोन ओळींनी आमचे संभाषण संपले. मॉस्को आणि रशियाचा इतर काही भाग फिरत असतांना तिला मेसेज टाकून तारीख कळवली तर हीने मला स्टेशनवर घ्यायला यायचीच तयारी दर्शवली आणि तुझा प्लान सांग त्याप्रमाणे शाळेला भेट देता येईल असे सुचविले. मी तिला अगदी पहिल्याच दिवशी शाळेला भेट दयायची आणि मग शहर फिरायचा माझा मनोदय सांगताच भल्या सकाळी ही आम्हाला घ्यायला स्टेशनवर हजर होती. आम्हाला घेऊन शाळेत गेली. गेल्यागेल्या पहिले समोर नाश्ता आणि त्यानंतर आम्हाला शाळा दाखवत माहिती द्यायला सुरुवात केली.
सन १९५७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून दहा वर्षे झाली, म्हणून त्याच्या दशकपूर्ती सोहोळयानिमित्त रशियाच्या सांक्त पितेरबुर्गमध्ये एक शाळा सुरु केली गेली आणि तिथे हिंदी शिकवण्याचा निर्णय घेतला गेला. शाळा उघडण्याचा निर्णय अतिशय उच्य स्तरावर झालेला असतो, त्यावेळचे सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह भारत भेटीवर येतात, आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भेटतात आणि यावेळी अनेक मैत्रीपूर्वक करारांवर स्वाक्षऱ्या होतात, त्यातच या शाळेची मुहूर्तमेढ रोवली जाते.
आज या शाळेची व्यवस्थापक आणि संचालक म्हणून इलेना शूबीना गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. चार तास ती आम्हाला तिची सुंदर शाळा दाखवत होती, काय दाखवू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली होती. प्रचंड जिद्दीने, हिमतीने, मेहनतीने, कल्पकतेने निर्माण केलेला शाळेचा प्रत्येक कोपरा भारत-रशिया मैत्रिपर्वाचे सुवर्णक्षण उजळून टाकीत होता. आम्ही गेलो त्या शाळेतील सगळेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक प्रत्यक्ष दिसत नसले तरी त्यांचे काम तिथे दिसत होते. कारण परीक्षेचे दिवस होते, सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत नव्हते.
पितेरबुर्ग भेटीत या शाळेला भेट द्यायचे ठरवल्यावर तिथल्या परीक्षेचा काळ मला माहिती असल्याने मी मॅडम इलेनाला मुलांचा कार्यक्रम ठेऊ नको, त्यांना अभ्यासात व्यत्यय येईल, असे आधीच सांगितले होते. या शाळेत हिंदी आणि इंग्रजी भाषा स्वतंत्र शिक्षिकांमार्फत आजही शिकवल्या जातात. अशा प्रकारची ही पितेरबुर्गमधील एकमेव शाळा आहे. ही शाळा सुरुवातीला ‘शाळा नंबर ४ – एक बोर्डिंग स्कुल- निवासी शाळा म्हणून सुरू झाली. मुलं इथे शिकण्याबरोबर निवास आणि अभ्यासही करू लागली. १९९५ मध्ये यात थोडा बदल करून शाळेला परदेशी भाषा शिकवण्याच्या दर्जाबरोबरच शिशु संगोपनासह निवासी शाळा तर सन २००२ मध्ये आजचा असलेला ‘एकमेव शाळा’ असा दर्जा देण्यात आला.
सन २००१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या रशिया भेटीत पितेरबुर्गमध्ये या शाळेच्या शिक्षकांनी आणि मुलांनी त्यांचे विमानतळावर हिंदीत बॅनर फडकवून स्वागत केले होते. सन २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रशिया भेटीत शाळेच्या हिंदी शिक्षकांनी त्यांची विशेष भेट घेऊन त्यांना शाळेविषयी हिंदीत माहिती दिली. दरवर्षी शाळेला एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ भेट देत असते. शाळेच्या संग्रहात तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पत्र जतन करून ठेवण्यात आली आहेत.
सन २००१ पासून शाळा आंतरराष्ट्रीय सेमिनार, आंतरराष्ट्रीय उच्च पातळीवरील भेटी, शहरातील विविध परिषदा, भारत-रशिया संबंधातील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत आहे. २ ऑक्टोबर २००७ रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शाळेत प्रथमच युनो सेक्रेटरींनी जाहीर केल्यानुसार ‘शांतता आणि अहिंसा’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यात रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी, सांक्त पितेरबुर्ग अॅडमिनिस्ट्रेटर, भारताचे वाणिज्यिदूत इतर अधिकारी यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेचा इतिहास इलेना मॅडम सर्व दाखवतांना सतत सांगत असतात तर प्रत्येक मजल्यावर, वर्ग चालू असतील तिथे जाऊन विद्यार्थ्यांना माझी आणि कुटुंबियांची ओळख करून देत असतात आणि मुलांना म्हणतात, “एवढ्या दूरवरून हे पाहुणे तुम्हाला भेटायला आलेय त्यांना काय शुभेच्छा व्यक्त कराल ?” छोटेशी पिल्ल मग त्यांना माहीत असलेले, ऐकलेले शब्द बोलतात: त्यांच्या आयुष्यात शांतता नांदू दे! खूप पैसा मिळू दे! ज्ञान मिळू दे! अशा एक नाही अनेक शुभेच्छा मला मिळत होत्या, अगदी मोठी माणसं देतात तशा…विविध वयोगट अगदी मंद बुद्धी मुलेही शाळेत होती मोठ्यांसारखे हात हातात घेऊन शुभेच्छा देणे आणि निघतांना आपण नक्की पुन्हा भेटू असे सांगणे मन प्रसन्न करून गेले त्यांच्यासाठी आम्हीही भरभरून शुभेच्छा दिल्या.
शिशु विभागात पाय ठेवला आणि आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो. सर्वच अविश्वसनीय पहात होतो… वर्गात अगदी सात-आठ मुले बाकी सर्व सुट्टीवर गेली होती, पण त्यांच्याबरोबर दोन आया- शिक्षिका. दिवसभराच त्यांच वेळापत्रक ठरलेलं. मुलं आल्यावर थोडे खेळतात, नंतर बडबड गीते म्हणायची, गोष्टी सांगायच्या पण आतमध्ये गेल्यावर कोणालाही थक्क करेल असे एका कोपऱ्यात एक दुकान थाटलेले, दुसऱ्या कोपऱ्यात पार्लर, तिसऱ्या कोपऱ्यात आणखी काही प्रत्यक्ष जीवनातील प्रसंग खेळ स्वरूपात मांडलेले… मुलांच्या कलेकलेने त्यांना पाहिजे ते शिकवले जाते. पुढे दुपारी त्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र खोली तिथे प्रत्येकाचा वेगळा पलंग… प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या, त्यांचा नाश्ता, जेवण, सायंकाळचा खाऊ तिथेच तयार होत होता किचनमध्ये…सर्व गोष्टी मशिनद्वारे त्यावर लक्ष ठेवायला कर्मचारी… जो तो आपापल्या कामात व्यग्र, मुलांना मातीत खेळता यावे, त्या कामाचीही त्यांना गोडी लागावी म्हणून शाळेच्या परिसरातच जमिनीत त्यांच्याकडून फुले, फळे, भाज्या पेरल्या
जाऊन, त्याचे संगोपन कसे करायचे, त्याची वाढ कशी होते, आणि नंतर मुलांसमोरच त्याचा उपयोग त्यांच्या खाद्यपदार्थात करण्यात येतो. अशा प्रकारच्या मुल्यशिक्षणातून पुढची भावी पिढी घडतांना बघून मी भारावून गेले होते…काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजेनासे झाले होते… मुलगा असो, मुलगी असो प्रत्येकाने आपापले घरातले कर्तव्य पार पाडायचे असते, कोणतेही काम करतांना कमीपणा येत नसतो हे ती मुलं आपोआप तिथे शिकत होती. कोणतेही शिस्तीचे दडपण नाही, प्रत्येक गोष्ट त्या चिमुरड्यांच्या कलाकलाने होत होती.
मोठ्या मुलांचा नाश्ता आणि दुपारचे जेवण शाळेतच होते, त्यांचे वेगळे कॅन्टीन, तिथले जेवणही पालकांच्या संमतीने ठरलेले. आपला पाल्य कॅन्टीनमध्ये काय खातो, तो जेवला की नाही हे त्या मुलाने कॅन्टीनमध्ये अन्न घेताच पालकाला कळते, मुलाने घेतलेल्या पदार्थांची रिसीट सरळ आई वडिलांच्या मोबाईलवर जाते, त्यामुळे शिक्षक-शाळा-पालक संबंध सुरळीत राहतात. शिक्षकही तिथेच जेवतात.
हिंदी भाषा शिकायची तर भारतीय पोशाख, राहणी, नृत्य, साहित्यही त्यात आले पाहिजे थोडक्यात भारतीय संस्कृतीचा मुलांना जवळून परिचय व्हावा यासाठी शाळा आटोकाट प्रयत्न करत असते. त्यामुळे तिथल्या मुलांना इयत्ता अकरावीपर्यंत हिंदी बोलण्याबरोबरच नृत्य, गाणी, नाटक या गोष्टी तर येतातच, परंतु साहित्याच्या शिक्षिकेबरोबर बोलल्यावर कळले की तिथे रशियन आणि भारतीय साहित्य विशेषतः हिंदी साहित्य याचा रशियन भाषेत तौलनिक अभ्यास केला जातो…आमच्या दोघींच्या बोलण्यातून तल्स्तोय-गांधी पत्रव्यवहार, गोर्की आणि भारतीय स्वातंत्र्यसैनिक मादाम कामा आणि इतर स्वातंत्र्य सैनिक यांच्यातील पत्रव्यवहार, रवींद्रनाथ टागोरांचे विचार, त्यांच्या कविता असे दोन देशांतील अनेक दुवे मुलांसमोर मांडले जातात…याच मैत्रीच्या दुव्यांबाबत चर्चा करण्यासाठी आपण पुनःपुन्हा भेटणे गरजेचे असल्याचे नमूद करून मी तिच्या वर्गातून अगदी जड अंतकरणाने बाहेर पडले होते. मुलांना भारतीय नृत्य शिकवतांना त्यासाठी लागणारे संगीत, नृत्यसाठी लागणारे साहित्य असो, गाणे असो, भारतीय पोशाख कसा परिधान करायचा यासाठी विशेष विभाग शाळेत निर्माण केले गेले आहेत. मुलांना भारतीय पाककृती माहिती असाव्या, त्या बनवता याव्या, सोप्या पाककृती त्यांना बनवता याव्या यासाठीही शाळेत एक विभाग आहे. त्याचबरोबर विज्ञानाचे विषयही प्रत्यक्ष मुलांनी प्रयोग करून शिकले पाहिजे यासाठी कसोशीने प्रयत्न या शाळेत होतात याची तिथल्या प्रयोगशाळा बघतांना जाणीव झाली.
रशियातली शाळा आणि तिथे खेळ नाही असे कधी होणार नाही. खेळ हा प्रत्येकाच्या जीवनातला महत्वाचा भाग असला पाहिजे आणि त्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली पाहिजे यासाठी या शाळेत विशेष प्रयत्न होतांना दिसतात. शाळेत प्रवेश करताच मोठे मैदान दिसते. त्या मैदानावरही विशेष मशागत करण्यासाठी खास प्रशिक्षित व्यक्ती काम करत होत्या, कारण नोव्हेंबर ते मार्चपर्यंत बर्फात झाकलेले मैदान पण नंतर जूनपर्यंत मुलांना प्रत्येक मैदानी खेळ आला पाहिजे, समजला पाहिजे यासाठी शाळेत विशेष प्रयत्न होतात. मात्र बर्फ असतांना विद्यार्थांना आपल्या आवडत्या खेळाची सवय रहावी, त्याचा त्यांना कायम सराव रहावा म्हणून यासाठी इनडोर मोठा हॉल ज्यामध्ये सर्व मैदानी खेळाचा सराव करता येतो. तसेच अत्याधुनिक जिम, आधुनिक सोयीसुविधांसह असलेला तरण तलाव प्रत्येक खेळासाठी विशेष मार्गदर्शक, हे सर्व ऐकतांना आणि प्रत्यक्ष पाहतांना एखाद्या विद्यापीठात आल्याचा भास होतो.
एकदा शाळेचा एक कोपरा (भिंत) एका पालकाला रिकामा दिसला, तो मुलाला सोडायला आला असता त्याच्या हे लक्षात आले. त्याने एक सुंदर पेंटिंग काढून शाळेला भेट दिले…तेवढ्याच मापाचे जेवढा तो कोपरा रिकामा होता…अशा खूप गोष्टी इलेना भारावून सांगत असते…मी आल्याची वर्दी ती अगदी भारतीय वाणिज्यदूतावासालाही देते… महान भारतीय कवी, तत्वज्ञ, रवींद्रनाथ टागोर यांचे नाव शाळेला देण्यात आले आहे. नऊ-दहा वर्षांपूर्वी भारत सरकारने शाळेला टागोरांचा एक पुतळा भेट द्यायचे ठरवले होते, त्यासाठी शाळेने जागाही करून दिली आहे. तो अर्धपुतळा पितेरबुर्गच्या भारतीय वकीलातीत येऊनही काही वर्षे उलटली होती, पण तो शाळेला का सुपूर्द केला जात नव्हता? कोणाकडेच याचे उत्तर नव्हते. आता मात्र त्या पुतळ्याचे १८ मार्च २०२१ रोजी शाळेत अनावरण करण्यात येणार आहे. पितेरबुर्ग येथील भारतीय कॉन्सुलेटचे वाणिज्यदूत दीपक मिगलानी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
शाळेचा कोपरा न कोपरा अभिमानानं दाखवतांना आम्ही सगळेच खूप भारावून गेलो होतो. शाळा बघायला एखादा तास लागेल अशा भ्रमात असणाऱ्या आम्ही तिघांनी घड्याळ बघितले तेव्हा तब्बल तीन तास उलटून गेले होते. त्यानंतरच्या इलेना मॅडमच्या चर्चा बैठकीत आम्ही सर्वच एकदम उद्गारलो, ‘ही शाळा नव्हे तर हे विद्यापिठाच आहे…’ भारत-रशिया संबंधाचं आणि भाषाभगिनींमधील दृढ नात्यांचं !