येवला – “अपने मंदिरमे बैठ बैठकर..गीता, भागवत बाचूंगी..ग्यान ध्यानकी गाठडी बांधकर, हरिहर संग मै लागूंगी”, या संत कवित्रित्री मीराबाईच्या ओळी आठवल्या की भगवान श्रीकृष्ण व मीराबाईची निस्सीम भक्ती आठवते. पण, ही भक्ती आता येवल्याच्या विणकरांनी पैठणीवर उतरवली आहे. त्यामुळे ही पैठणी लक्षवेधी व चर्चेची ठरली आहे. विशेष म्हणजे ही पैठणी ज्या ग्राहकाने बनवण्यास सांगितली, तो ग्राहक ही पैठणी इस्कॅान मंदिराला भेट देणार आहे.
येवल्यातील पैठणी विणकर सुनील कोकणे यांनी ही पैठणी बनवली आहे. कृष्ण भक्त असलेल्या एका ग्राहकाने कोकणे यांना अशा स्वरुपाची पैठणी तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यानंतर कोकणे यांनी दीड ते पावणे दोन महिन्याच्या काळात अतिशय सुंदर अशी श्रीकृष्ण आणि मिराबाई यांची कलाकृती हुबेहुब पैठणीवर उतरवली आहे. यापूर्वी कोकणे यांनी राधाकृष्ण तसेच हरणांचे कळप असलेली पैठणी बनवली होती. पण, यावेळी साकारलेली ही पैठणी नेहमीच्या पैठणीपेक्षा वेगळी आहे. पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या येवला शहरात अनेक घरांमध्ये पैठणी विणकामाच हातमाग सुरु असतात. अनेक विणकर आपल्या पध्दतीने आकर्षक पैठणी विणत असतात. त्यामुळे येथे असे अनेक वेगवेगळे प्रयोग केले जातात. त्यानंतर त्याची चर्चाही होते. श्रीकृष्ण व मीराबाईची ही पैठणी त्यामुळेच लक्षवेधी ठरली आहे.