मनाली देवरे, नाशिक
…..
आयपीएल स्पर्धेत एकदमच रटाळ आणि एकतर्फी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी मोठा पराभव करून आज फक्त २ गुणांची कमाईच केली नाही तर स्पर्धेच्या अंतिम टप्यात निर्णायक ठरु शकणारा नेट रनरेट देखील मजबूत करुन घेतला.
गेले दोन दिवस मुंबईत धो-धो पाऊस पडतोय. जणु काही याचाच कित्ता गिरवत मुंबई इंडियन्स संघाने तिकडे दूर वाळवंटात, अबुधाबीमध्ये फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला आणि मग १९५ धावांचा पाठलाग करतांना कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांची माञ पुरती दमछाक झाली. केकेआर संघाचे पहिले चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये लवकर परतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या त्या आंद्रे रसेल वर. रसेल कडे सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. त्याने ते अनेकदा सिध्द देखील केले आहे. तो मैदानात असे पर्यंत केकेआर साठी विजयाच्या आशा जिवंत होत्या. परंतु बुम बुम बुमरा या मुंबईच्या तेवढ्याच भरवशाच्या गोलंदाजाने एका परफेक्ट याॕर्कर वर रसेलला क्लिन बोल्ड करुन केकेआरच्या विजयाच्या आशा गुंडाळून ठेवल्या. त्यानंतर पॕट कमिन्सने ११ चेंडूत ३३ धावा करुन डावात थोडा जिवंतपणा आणला होता खरा, परंतु तो देखील व्यर्थ ठरला.
रोहीतची धडाकेबाज खेळी
मुंबई इंडियन्स संघाच्या डावात आज कर्णधार रोहित शर्माने धुवांधार फलंदाजी केली. आयपीएल कारकिर्दीमध्ये वैयक्तिक ५००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी त्यांला फक्त १० धावा कमी पडल्या. हिटमॕन शर्माने केकेआर च्या सगळ्याच गोलंदाजाना आज धो-धो धुतले. खास करून अंगावर येणारा प्रत्येक शॉर्टपिच चेंडू रोहित शर्मा सहजपणे सीमारेषेपार ढकलत होता. रोहीतच्या ८० धावा (५४ चेंडू) आणि सुर्यकुमार यादवच्या ४७ धावा (२८ चेंडू) यांच्या जोरावर मुंबई इंडीयन्स आपली धावसंख्या २०० च्या पुढे नेऊन ठेवेल असे वाटत होते. परंतु खासकरून १५व्या षटकानंतर त्यांची फलंदाजी ढेपाळली आणि १९५ वर त्यांचा डाव आटोपला.
शिवम मावी चमकला
केकेआर संघात अनुभवी गोलंदाज असताना देखील दिनेश कार्तिकने डावातली शेवटची ओव्हर शिवम मावीच्या हातात दिली. त्याची आजच्या सामन्यातली कामगिरी उत्तम असल्यानेच त्याला कर्णधाराचा विश्वास जिंकता आला. शिवम मावी या गोलंदाजाकडे भारतीय क्रिकेटसाठी एक भविष्यातला चांगला खेळाडू म्हणून या सामन्यानंतर बघितले जाईल. त्याने आज किफायतशीर गोलंदाजी करुन दोन बळी घेत भारतीय क्रिकेट निवड समितीचे लक्ष नक्कीच वेधले असेल.
गुरुवार चा सामना
ऑनफिल्ड अंपायरच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याने दिल्ली कॕपिटल्स विरुध्द झालेल्या “टच अँड गो” सामन्यात पराभूत झालेल्या किंग्ज इलेव्हन संघाची गुरुवारी लढत होईल ती आपला पहिला सामना जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स, बंगलोर संघाविरुध्द.
दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे सामना रोमहर्षक होईल हे नक्की.