तिरुपती – तिरुपती देवस्थान हे आपल्या देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. तेथे प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू हे चक्क अवैधरित्या विकले जात आहेत. याप्रकरणी एका बनावट वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिरुमला तिरुपती देवस्थानाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हे संकेतस्थळही ब्लॉक केले आहे. डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.बालाजीप्रसादम.कॉम या वेबसाईटमुळे सोशल मीडियावर गोंधळ उडाल्याने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
आम्ही सर्वात कमी किमतीत हे लाडू देशभरात विकतो असा दावा या वेबसाईटने केला होता. तिरुमला येथे प्रसाद म्हणून तयार होणारे हे लाडू भक्तांना फारच आवडतात. म्हणूनच याला खूप मागणी असते. जगभरात वर्षभर हा प्रसाद पाठवला जातो. तिरुपती देवस्थान दरवर्षी जवळपास १० कोटी लाडू तयार करते. प्रत्येक लाडवाची ५० रुपयांत विक्री केली जाते.