लखनऊ – हिंदी चित्रपटांमध्ये आपण अनेक वेळा दोन प्रियकर आणि एक प्रेयसी किंवा दोन प्रेयसी आणि एक प्रियकर असा प्रेमाचा त्रिकोण बघितलेला आहे. प्रत्यक्षात देखील काही वेळा असे घडते. परंतु मेरठ येथे वेगळाच प्रकार घडला. येथे दोन मुलींना एकाच मुलाशी लग्न करायचे होते, हा प्रकार पाहून पोलीस देखील चक्रावून गेले, कारण त्या दोन सख्ख्या बहिणी असून अल्पवयीन आहेत, आणि त्या दोघी आपल्या एकाच प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम आहेत. त्यासाठी या मुलींनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.
त्याचे असे झाले की, दोन अल्पवयीन बहिणींनी घराबाहेर पडून गंगानगर पोलिस स्टेशन गाठले. तसेच पोलिसांना आमचे दोघींचे एकाच तरूणावर प्रेम असल्याने त्याच्याशी लग्न लावून दयावे, अशी विनंती केली. विशेष म्हणजे दोघेही एका अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडले आहेत. दोघांनाही त्याच्याबरोबर लग्न करायचे असल्याचे ऐकून पोलिसांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला असून प्रत्यक्षात अद्याप त्या मुली कोणाचे ऐकण्याच्या तयारीत नाहीत. तसेच या दोघी बहिणींनी इशारा दिला की, जर त्यांचे एकत्र लग्न त्याच तरूणाशी लग्न झाले नाही, तर त्या काहीही करू शकतात, आता पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर अन्य नातेवाईकांनीही गंगानगर पोलिस स्टेशन गाठले. पोलिस आणि नातेवाईक दोघेही समजावून सांगण्यात व्यस्त असून सध्या कुटुंबीय दोघा मुलींना घरी घेऊन गेले आहेत.