नवी दिल्ली – कोरोना महामारीसारख्या गंभीर परिस्थितीत एकीकडे संपूर्ण जग लढत असताना दुसरीकडे या संकटातून संधी शोधून काही जण स्वतःचं उखळ पांढरं करत आहे. कोरोना संकटाचा सामना करताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये बनावट लस पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. टोळीकडून तीन हजारांहून अधिक बनावट डोस जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी ८० हून अधिक जणांना अटक केल्याचं चीनची वृत्तसंस्था सिन्हुआनं सांगितलं. या घटनेमुळे चीन सरकारसह तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे.
सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गेल्या सप्टेंबरपासून बनावट लशीचा पुरवठा सुरू होता. पोलिस या लशीच्या मागावर मागावर होते. अखेर या टोळीपर्यंत पोहोचण्यास यश आले. पोलिसांनी बीजिंग, शांघाई, पूर्व प्रांतातील शानदोंगसह अनेक ठिकाणी छापेमारी केली. बनावट लसी परदेशातही पाठवण्याचा प्रयत्न या टोळीचा प्रयत्न असू शकतो, असं ग्लोबल टाइम्सनं म्हटलं आहे.
चीनमध्ये वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन चिंतेत
चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या
माहितीनुसार, ३० जानेवारीला कोरोनाचे ९२ रुग्ण आढळले आहेत. २४ जानेवारीनंतर एका दिवसात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकानं कोरोना विषाणू कुठून आला याचा शोध घेण्यासाठी वुहानमधील रुग्णालयाला भेट दिली. पथकानं तेथील शास्त्रज्ञांशी चर्चा केली. तसंच कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचीही भेट घेतली. हे पथक वुहानमध्ये अनेक ठिकाणी भेटी देणार आहे.