येवला – गेल्या काही दिवसांपासून शहरातून मोकाट गायींची रात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून चोरी होत आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहनातून येवून गायींना भूलींचे इंजेक्शन देवून चोरी होत असल्याचे उघड होत आहे.
दोन दिवसांपूर्वी गायी चोरीची घटना घडल्याचे गोरक्षकांकडून सांगितले जाते. रविवारी (२३ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास विंचूररोड परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याने जागे झालेल्या नागरिकांनी एका चारचाकी वाहनातून गायी नेल्या जात असल्याचे पाहिले. काही गोरक्षक धावून आले मात्र वाहन नाशिकच्या बाजूने फरार झाले. दरम्यान, सहा गायींना भुलीचे इंजेक्शन दिल्याचे आढळून आल्याने पशुचिकित्सकला पाचारण करून गायींवर उपचार केल्या गेले. शहरात मोठ्या संख्येने मोकाट गायी आहेत. या मोकाट गायींची चोरी होत असल्याने यासंदर्भात तक्रार केली जात नाही. या प्रकरणी पोलिस यंत्रणेने लक्ष घालण्याची मागणी गोप्रेमींकडून केली जात आहे.