मुंबई – यू ए. ई. मधील भारतीय वंशाचे उद्योजक बी.आर.शेट्टी यांना त्यांची सुमारे २ अब्ज डॉलरची संपत्ती अवघ्या ७३ रुपयांना विक्री करावी लागली आहे. शेट्टी यांची फिनाब्लर पीएलसी नावाची संपूर्ण कंपनी इस्राईल-यू.ए.ई. कन्सोर्टियमला केवळ १ डॉलर म्हणजेच जवळपास ७३.५२ रुपयांना विकावी लागली आहे. शेट्टी आणि त्यांच्या कंपनीवर अब्जावधी डॉलर्सचे कर्ज आहे. शिवाय कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असून त्यांची देखील चौकशी सुरु आहे.
असा झाला व्यवहार
२०१९ मध्येच शेट्टी यांच्या कंपनीवर स्टॉक एक्सचेंजेस मध्ये काम न करण्याची सक्ती लावण्यात आली होती. शिवाय कंपनी जवळपास दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे कोणीही त्यात गुंतवणूक करण्यास तयार नव्हते. अशावेळी दोन देशांमध्ये बनलेल्या कन्सोर्टियमने ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. मागील वर्षी डिसेंबर या कंपनीने केलेल्या एकूण व्यवसायाचे बाजारमूल्य १.५ बिलियन पाउंड (म्हणजे २ अब्ज डॉलर्स) इतकी होती. मात्र त्याच वेळी कंपनीवर १ अब्ज डॉलरचे कर्ज असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील प्रक्रिया
आता फिनाब्लरने ग्लोबल फिनटेक इन्वेस्टमेंट्स होल्डिंग (जीएफआयएच) यांच्यासह एक करार करून कंपनीच्या सगळ्या मालमत्ता त्यांना विकण्याचे ठरवले आहे. जीएफआयएच ही इस्राईलच्या प्रीज्म ग्रुप ची सहयोगी कंपनी आहे. या प्रीज्म ग्रुपने अबुधाबी च्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर्स बरोबर मिळून एका कंसोर्टियम चे गठन केले आहे. त्याच्या माध्यमातूनच शेट्टी यांच्या कंपनीचा सगळा व्यवहार होतो आहे.
अशी होती करिअरची सुरुवात
प्राप्त माहितीनुसार बी.आर. शेट्टी हे सत्तरच्या दशकात केवळ आठ डॉलर्स खिशात घेऊन यू.ए.ई. ला आले आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर शेट्टी यांनी हेल्थ सेक्टर मध्ये या कंपनीची सुरुवात केली आणि त्यातून बराच पैसा कमावला. १९८० मध्ये त्यांनी यूएई एक्सचेंजमध्ये कंपनी ची सुरुवात केली.