भंडारा – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (दि. ८) रात्री उशिरा लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर आपल्या नवजात बाळांच्या जाण्याने त्यांच्या पालकांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
सिक – न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू) येथे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत १० अर्भकांचा जागीच मृत्यू झाला तर युनिटमधून सात अर्भकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या सर्व मुलांचे वय एक दिवस ते तीन महिने होते. हॉस्पिटलमधील दुर्लक्षामुळे या मुलांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येते. आयसीयू विभागात एकूण १७ मुले दाखल करण्यात होती, त्यातील केवळ सातच मुले वाचू शकली. या वार्डात रात्री ड्युटीवर असलेल्या परिचारिकाने आतमध्ये धूर येत असताना बघून विभागाचा दरवाजा उघडला. आणि तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले. यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत आग पसरल्याने १o निष्पाप बालकांचे जिव गमावले होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे