नाशिक – लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना भाजीपाल्या सह अन्य वस्तूंची प्रत्यक्षविक्री करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असतांना आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या परिस्थितीला मिरचीच्या पिकाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने पिकावर कीड पडून ते खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, बागलाण या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येवला तालूक्यातील पिंपळगाव जलाल येथिल भानूदास बनकर यांनी पारंपारिक पीक घेण्याऐवजी दोन महिन्यापुर्वी मिरची या फळ पिकाची लागवड केली होती. मिरची पिकाच्या लागवडीसाठी त्यांना सव्वा लाखापर्यंत खर्च आला होता. यंदा मिरचीला ३५ ते ४५ रुपयांच्या दराने ही मिरची एक्सपोर्ट कंपनी खरेदी करणार होते. मात्र येवला तालुक्यात आठवडाभर सातत्याने पाऊस झाल्याने पिकांवर शेंडाकरपा, भुरी, थ्रिफ आणि मुळांवर बुरशी अशा विविध रोगांमुळे पीक खराब झाले आहेत. औषध फवारणी केली असता पाऊस पडल्यामुळे त्याचा उपयोग न झाल्याने पीक खराब झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सुरवातीला दोन तोड्यातून ५०० क्विंटल मिरची विकली गेली. त्यातून अपेक्षित उत्त्पन्न न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे केलेला खर्च वसूल होणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.