नाशिक – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सतत ठिकठिकाणी कारवाई केली जाते. त्यातच कोरोना निर्बंधांचे पालन होते आहे की नाही, याची शहानिशा करणे व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागावरच आहे. मात्र, याच अतिक्रमण विभागातील महापालिकेचे दोन कर्मचारी चक्क ५०० रुपयांची लाच घेताना पकडले गेले आहेत.
अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, जुने सिडको महापालिकेच्या दवाखान्यासमोर एका टेम्पोमध्ये एक विक्रेता कांदे आणि बटाटे विक्री करीत होता. त्याचवेळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक तेथे आले. या पथकाने विक्रेत्याचा वजन काटा जप्त केला. पथकातील कर्मचारी प्रकाश माधवराव चव्हाण आणि राजेंद्र पुंडलिक निगळ यांच्याकडे भाजी विक्रेत्याने वजन काटा परत देण्याची विनंती केली. त्यानंतर या दोघांनी हा वजन काटा परत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर भाजी विक्रेत्याने एसीबीकडे तक्रार केली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. अखेर प्रकाश चव्हाण आणि राजेंद्र निगळ हे महापालिकेच्या सिडको कार्यालयाच्या आवारात ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. याप्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी तक्रार करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.