यांगून – म्यानमारमध्ये सध्या मोठा अंतर्गत संघर्ष सुरू आहे. सशस्त्र सेना दिनानिमित्त म्यानमारच्या सैन्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. लोकशाहीची मागणी करणाऱ्या निदर्शकांवर देशभरात अनेक ठिकाणी बंदुकीने गोळीबार करण्यात आला. त्यात ९० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे.
सैन्याच्या विरोधात १ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये ४०० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्यानमारमध्ये शनिवारी नेपेटा येथे सैन्यदिनाच्या निमित्ताने झालेल्या परेड दरम्यान अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
शासनाचे वरिष्ठ जनरल मीन ऑंग म्हणाले की, सैन्य देशातील लोकांचे संरक्षण करेल. तसेच कोणतेही आंदोलन केल्यास निदर्शकांना गोळ्या घालता येतील. मात्र हा इशारा झुगारून देत मोठ्या संख्येने निदर्शकांनी यंगून आणि मंडाले यासह अनेक शहरांच्या रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी देशभरात सुरक्षा दलाच्या गोळीबारात ९० जणांचा मृत्यू झाला आहे.
सैन्य-विरोधी गटाचे प्रवक्ते डॉ. सेसा म्हणाले की, देशासाठी आजचा दिवस लज्जास्पद आहे. कारण सैन्यदल हे आंदोलकांची पक्ष्यांप्रमाणे हत्या करीत आहे. असे असूनही आम्ही संघर्ष करत राहू. सैनिकी शासन संपेपर्यंत आम्हाला लढावे लागेल.
म्यानमारमध्ये सैन्याच्या कारवाई विरोधात आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. तथापि, चीनने मात्र म्यानमारमधील सत्ताविरूद्ध उघडपणे विरोध केलेला नाही. कारण त्यांचे म्यानमारमधील सैन्याशी घनिष्ट संबंध आहेत.
१ फेब्रुवारीला नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीचे सरकार उलथून सैन्याने राज्य कारभार ताब्यात घेतला. त्यानंतर अनेक राजकीय नेते कोठडीत असून सर्वोच्च नेता आंग सॅन सू की यांचा त्यात समावेश आहे.