औरंगाबाद / बीड – महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरू असतानाच मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मात्र अत्यंत हृदयद्रावक आणि भयानक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आठ जणांच्या मृतदेहांना एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेवरुन सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
सदर घटनेनंतर प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त आहे. मृताच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर आणि तालुका परिसर हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मंगळवारी शहर परिसरामध्ये १६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यात स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सात आणि लोखंडे कोविड केअर सेंटरमधील एक अशा एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर नगरपालिकेकडून मांडवा रोड स्मशानभूमीत आठही जणांना एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले
सर्व मृतांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. या घटनेनंतर अंत्यसंस्काराचा फोटो व्हायरल होताच जिल्ह्यात प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे मार्चपर्यंत अंबाजोगाईमध्ये केवळ एक हजार कोरोनाची लागण झाली होती. परंतु गेल्या ४ दिवसांत ही संख्या वाढली आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २८ हजार ४९१ रुग्ण आढळले असून ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २५ हजार ४३६ संसर्गित लोक बरे झाले असून घरी गेले आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९.९३ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण २.३५ टक्के आहे.