भारतीय-अमेरिकी डॉ. मूर्ती अमेरिकेचे नवे सर्जन जनरल
नवी दिल्ली – भारतीय मूळ असलेले अमेरिकी नागरिक डॉ. विवेक मूर्ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे नवे सर्जन जनरल असतील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास आपली प्राथमिकता असेल, असं त्यांनी ट्विट करून सांगितलं. सर्जन जनरल म्हणून सेवा करण्यासाठी सिनेटनं मान्यता दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं ते म्हणाले. आपल्या देशानं गेल्या एका वर्षात मोठ्या समस्यांचा सामना केला आहे. मी देशाला पुढं घेऊन जाण्यासाठी तसंच आमच्या मुलांचं भविष्य आणखी सुधरवण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास उत्साहित आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
अमेरिकी सिनेटनं मंगळवारी (ता. २३) मतदान घेऊन विवेक मूर्ती यांना सर्जन जनरल म्हणून निवडलं. विवेक मूर्ती यांना ५७ अमेरिकी सिनेटर्सनी मत दिलं. तर ४७ जणांनी त्यांच्या नावाला सहमती दर्शवली नाही. अशाप्रकारे बहुमताच्या आधारे भारतीय-अमेरिकी नागरिक असलेल्या मूर्ती यांना ज्यो बायडेन यांचा सर्जन जनरल निवडण्यात आलं. डॉ. मूर्ती यांनी माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकालादरम्यान सर्जन जनरल म्हणून काम केलं होतं. परंतु २०१७ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांना पदावरून हटवलं होतं.
डॉ. मूर्ती यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. मूर्ती सिनेटर्ससमोर म्हणाले की, सामान्य माणसांना स्पष्ट आणि विज्ञानावर आधारित मार्गदर्शन करून लोकांची तसंच कुटुंबाची सुरक्षा करण्याची माजी इच्छा आहे. अमेरिकी नागरिकांना मास्क वापरण्यासारख्या उपाययोजनांसाठी राजी करणं आपल्यासमोरील मोठं आव्हान असेल, असं ते म्हणाले. बायडेन यांच्या कोरोना विषाणू सल्लागार मंडळाच्या सहअध्यक्षपदीही डॉ. मूर्ती यांनी काम केलं आहे.