वॅाशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर जो बायडन यांनी ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. बायडन यांना मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट यांनी बायबलला साक्षी ठेवून शपथ दिली. यावेळी बायडनच्या पत्नी जिल बायडन आपल्या हातात बायबल घेऊन उभ्या होत्या. या सोहळ्यात अगोदर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांच्याकडून उपाध्यक्षपदाची शपथ दिली.
शपथविधीनंतर झालेल्या भाषणात जो बायडन यांनी सांगितले की, मी संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, कुणाबरोबरही भेदभाव होणार नाही. अमेरिकेत वर्णभेदाविरोधात आपल्याला लढाई लढायची असून एकजुटीने अमेरिकेला एकत्र आणण्याचे काम करायचे आहे. एकजुटीशिवाय शांतता शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेत विकास घडवण्यासाठी मेहनतीने काम करु असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी त्यांनी देशांतर्गत दहशतवादाला हरवण्याचं मोठे आव्हान असल्याचाही उल्लेख केला.