नवी दिल्ली – भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड जेम्स ऑस्टिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत आणि अमेरिकेदरम्यान धोरणात्मक भागीदारीबाबत या प्रसंगी चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संरक्षणविषयक सहकार्याचं महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केलं. लोकशाही, विविधता आणि नियमांबाबतची कटिबद्धता या गोष्टींच्या माध्यमातून दोन्ही देशांमधलं नातं अधिक जवळ आल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
भारत-प्रशांत विभागात शांतता, स्थैर्य आणि संपन्नता येण्यासाठी उभय देशांदरम्यानची धोरणात्मक भागीदारी आणखी वाढवण्याची अमेरिकेची इच्छा असल्याचं संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी नमूद केलं. अध्यक्ष बिडेन यांचा शुभेच्छा संदेशही त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवला. ऑस्टिन यांनी काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली.