नवी दिल्ली – अमेरिकेत सत्ता बदलल्यानंतर बायडेन प्रशासनातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी भारतातील अनेक संबंधित मंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे मैत्रीपूर्ण संपर्क साधला होता, पण आता याच अनुषंगाने अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन या महिन्यात भारताला भेट देणार आहेत. यावेळी ऑस्टिन हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी द्विपक्षीय संरक्षण मुद्द्यांसह विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत.
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्याव्यतिरिक्त ऑस्टिन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची द्विपक्षीय संरक्षणविषयक महत्त्वाचे विषय चर्चा होईल. ऑस्टिन हे भारत दौर्यावर येणार्या बायडेन प्रशासनाचे पहिले कॅबिनेट मंत्री असतील काही तज्ज्ञांच्या मते, इंडो-पॅसिफिक प्रदेशाबद्दलचे नवीन सरकारचे धोरण हे पूर्वीच्या सरकारपेक्षा वेगळे नाही, मात्र यावेळी अनेक संरक्षण सौदे वाटाघाटी सुरू होणार आहेत, त्यामुळे आता नव्याने प्रगतीचे संकेत मानले आहेत.
दरम्यान, ऑस्टिनच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान योशिहिदा सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात क्वाड संघटना अंतर्गत १२ मार्च ते १८ मार्च दरम्यान आभासी बैठक होणार आहे. याकरिता चारही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये संपर्क सुरू आहे.
गेल्या दशकात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी संरक्षण करारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २००८ पर्यंत भारत अमेरिकेतून फारच कमी संरक्षण उपकरणे इत्यादी खरेदी करीत असे. परंतु त्यानंतर ते प्रमाण झपाट्याने वाढले आहे. २००८ ते २०२० या कालावधीत भारताने अमेरिकेकडून २१ अब्ज डॉलर्स किमतीची संरक्षण उपकरणे खरेदी केली असून सध्या दोन्ही देशांमधील २१ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण करारांवर वाटाघाटी सुरू आहेत.