अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री
ज्यो बायडेन यांचे प्रशासन आल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंधात अधिक वाढ होईल असे संकेत आता मिळू लागले आहेत. या संदर्भातली महत्त्वाची घटना म्हणजे नव्या सरकारचे संरक्षणमंत्री म्हणून लॉईड ऑस्टिन यांना सेनेटच्या लष्करी समितीने मान्यता दिली आहे. लॉईड ऑस्टिन हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री आहेत.
लॉईड ऑस्टिन हे अमेरिकन लष्करात चार तारांकित जनरल होते व ते सेंट्रल कमांडचे प्रमुख म्हणून २०१६ साली निवृत्त झाले. लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सात वर्षांपर्यंत संरक्षणमंत्री होण्याची अमेरिकेत मुभा नाही, पण बायडेन यांना तेच संरक्षणमंत्री म्हणून हवे होते व त्यांनी नियमाला अपवाद करून ऑस्टिन याना संरक्षणमंत्री म्हणून मान्यता देण्याची विनंती सिनेटला केली होती, जी सिनेटने मान्य केली.
सिनेटने त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पहिल्याच निवेदनात लॉईड ऑस्टिन यांनी भारताबरोबरचे संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्याची घोषणा केली आहे. भारताला ओबामा यांच्या काळातच अमेरिकेने संरक्षण सहकारी हा दर्जा दिला आहे, त्यात आणखी भर टाकण्याची ऑस्टिन यांची योजना आहे. अर्थातच चीनला आवर घालण्याची जी काही योजना अमेरिकेने आखली आहे, त्या योजनेअंतर्गत भारताशी संरक्षण सहकार्य वाढविण्यात येणार आहे.
भारताचा भर हा अमेरिकेकडून अधिकाधिक शस्त्रास्त्रे मिळविण्यापेक्षा अधिकाधिक संरक्षण तंत्रज्ञान व आजवर नाकारण्यात आलेले अन्य स्वरूपाचे दुहेरी तंत्रज्ञान मिळविण्यावर आहे. आजवर चीनने अमेरिकेशी चांगले संबंध ठेवून छुप्या मार्गाने हे अमेरिकन तंत्रज्ञान मिळवले होते, व त्याचाच वापर ते आता अमेरिकेला शह देण्यासाठी करीत आहेत. भारताने यापुढच्या काळात ऑस्टिन यांच्याशी अधिक संवाद ठेवून भारताची संरक्षण क्षमता वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धीप्रमुख जेन साकी यांनीही आपल्या पहिल्याच निवेदनात भारताशी असलेल्या दृढ संबंधांचा उल्लेख केला आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या उपाध्यक्ष झाल्याने हे संबंध आणखी दृढ होतील असे म्हटले आहे. हे सर्व संकेत बायडेन यांच्या काळातील भारत अमेरिका संबंधांची दिशा दर्शविणारे आहेत.
हिमालयात चीनने ज्या लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत त्या लक्षात घेता, तसेच जागतिक राजकारणात चीनने अमेरिकेला आव्हान देण्यास सुरवात केली आहे, त्यामुळे भारत व अमेरिका या दोन्ही देशांना एकमेकांशी संरक्षण सहकार्य करणे आवश्यक आहे, ही जाणीव दोन्ही देशांत आहे व हे सहकार्य परस्परांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखून करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच रशियाकडूनही भारत संरक्षण साहित्य घेऊ शकतो. पण लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले आहे की, संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला पर्याय नाही, कारण भारताचे जागतिक स्थान उंचावत राहील तसे भारतापुढील संरक्षण आव्हाने वाढत राहणार आहेत व त्यांना तोंड द्यायचे असेल तर सर्व संरक्षण साहित्य देशातच निर्माण होणे आवश्यक आहे. अमेरिकेशी होणारे संरक्षण सहकार्य त्या दृष्टिने उपयुक्त ठरू शकते.